(कोल्हापूर / हातकणंगले)
हातकणंगले ग्रामीण रुग्णालयासमोर बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास धनबाद एक्स्प्रेसची धडक बसून १७ वर्षीय अनुष्का (रा. सुतार मळा, इचलकरंजी) हिचा जागीच मृत्यू झाला. रेल्वे येत असल्याचे लक्षात आल्यानंतर तिच्या दोन मैत्रिणींनी ‘अनुष्का… थांब!’ असा आक्रोश करत तिला वाचवण्यासाठी धाव घेतली. मात्र त्या अवघ्या आठ-दहा फुटांवर असतानाच रेल्वेची तिला धडक बसली. अनुष्काच्या दोन्ही कानांत ब्लूटूथ इअरबड्स असल्याने मैत्रिणींच्या हाका तसेच रेल्वेचा आवाज तिच्यापर्यंत पोहोचला नसल्याचे घटनास्थळी उपस्थितांकडून सांगण्यात आले.
अनुष्का कोरोची येथे आरोग्य परिचरचे शिक्षण घेत होती. हातकणंगले ग्रामीण रुग्णालयासमोर राहणाऱ्या मैत्रिणींना भेटण्यासाठी ती दोन मैत्रिणींसोबत आली होती. बुधवारी सकाळी सुमारे ११ वाजता तिघी रेल्वे रुळाच्या बाजूने चालत असताना अनुष्का पुढे होती, तर तिच्या दोन्ही मैत्रिणी सुमारे २० ते ३० फूट अंतरावर मागे होत्या.
याचवेळी रेल्वे येत असल्याचे मैत्रिणींच्या लक्षात आले. त्यांनी अनुष्काला सावध करण्यासाठी ओरडत तिच्या दिशेने धाव घेतली. मात्र अनुष्का रेल्वे रुळावरून पुढेच चालत राहिली. मैत्रिणी तिच्यापर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नात असतानाच धनबाद एक्स्प्रेसची धडक बसली. त्यांच्या डोळ्यांसमोरच अनुष्काचा मृत्यू झाला.
धडकेमुळे अनुष्काचा मृतदेह सुमारे ३० फूट हवेत उडाल्याचे सांगण्यात आले. या घटनेत तिच्या शरीरावरील रक्त व मांसाचे शिंतोडे मैत्रिणींवर उडाले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे दोन्ही मैत्रिणी घटनास्थळीच बेशुद्ध पडल्या. काही क्षणांपूर्वी सोबत चालणारी मैत्रीण डोळ्यांसमोरून कायमची निघून गेल्याने त्यांना मोठा मानसिक धक्का बसला.
अपघाताची माहिती मिळताच हातकणंगले ग्रामीण रुग्णालयातील जीवरक्षक स्वप्निल नरूटे घटनास्थळी दाखल झाले. बेशुद्ध झालेल्या मैत्रिणींना प्रथमोपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर रेल्वे अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली.
रेल्वे पोलीस आणि हातकणंगले पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. अनुष्काचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची नोंद हातकणंगले पोलिस ठाण्यात झाली असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.
दरम्यान, या दुर्घटनेमुळे हातकणंगले ग्रामीण रुग्णालय परिसरातील रेल्वे रुळाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे. ग्रामीण रुग्णालय तसेच समाजकल्याण विभागाच्या मुला-मुलींच्या वसतिगृहासमोरून रेल्वे रुळ जातो. रेल्वे विभागाने सुरक्षेच्या दृष्टीने सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर रुळाच्या दोन्ही बाजूंना जाळी बसवली आहे.
मात्र, रुग्णालयाच्या बाजूला रेल्वे रुळ ओलांडण्यासाठी सुमारे दोन फुटांची जागा असल्याचे सांगण्यात येते. बुधवारी अनुष्का आणि तिच्या मैत्रिणी याच मार्गाने रेल्वे रुळाच्या दिशेने गेल्या. त्यानंतर काही क्षणांतच ही दुर्घटना घडली. सुरक्षेसाठी जाळी बसवण्यात आली असली तरी उरलेल्या जागेतून रुळापर्यंत पोहोचण्याचा मार्ग उपलब्ध असल्याचे या घटनेच्या पार्श्वभूमीवर समोर आले आहे.
अनुष्का मैत्रिणींना भेटण्यासाठी ग्रामीण रुग्णालय परिसरात आली होती. काही वेळ त्यांच्यासोबत आनंदात घालवण्यानंतर तिच्यावर काळाने घाला घातला. सोबत चालणारी मैत्रीण क्षणार्धात कायमची निघून गेल्याने तिच्या मैत्रिणींवर दुःखाचा डोंगर कोसळला. या हृदयद्रावक घटनेने हातकणंगले परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे.


