(पुणे)
NEET पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात संतापाची लाट उसळली असताना आता पुण्यातही आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, या मागणीसाठी ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या वतीने 11 जून रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके करणार असून, मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि तरुण सहभागी होणार असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे. आंदोलनासाठी पोलीस प्रशासनाकडे मंगळवारी (9 जून) अधिकृत परवानगी अर्ज सादर करण्यात आला आहे.
याआधी दोन दिवसांपूर्वी देशाची राजधानी दिल्ली येथेही कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने मोठे आंदोलन करण्यात आले होते. NEET पेपरफुटी प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली होती. विशेष म्हणजे या आंदोलनासाठी पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके हे थेट अमेरिकेतून दिल्लीमध्ये दाखल झाले होते.
“कॉकरोच जनता पार्टी”ची देशभरात चर्चा का?
15 मे 2026 रोजी सर्वोच्च न्यायालयातील एका सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी बेरोजगार युवकांविषयी केलेल्या एका वक्तव्यानंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली होती. त्यानंतर आम आदमी पक्षाच्या प्रसिद्धी विभागाशी संबंधित असलेले मराठी युवक अभिजीत दिपके यांनी ‘कॉकरोच जनता पार्टी’ या नावाने सोशल मीडियावर संघटना सुरू केली. तरुणांच्या बेरोजगारी, शिक्षण व्यवस्था आणि स्पर्धा परीक्षांमधील गैरव्यवहार यांसारख्या मुद्द्यांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवण्यास सुरुवात केली. अल्पावधीतच लाखो युवकांनी या मोहिमेला पाठिंबा दिला असून सोशल मीडियावरही या संघटनेची मोठी चर्चा सुरू आहे.
पुण्यातील आंदोलनाकडे विद्यार्थ्यांचे लक्ष
NEET पेपरफुटी प्रकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता वाढली असून पुण्यात होणाऱ्या आंदोलनाकडे राज्यभरातील विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता आणि जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी यावेळी जोरदारपणे करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

