(रायगड / वृत्तसंस्था)
तक्रारदाराच्या पत्नीची बदली करून देण्यासाठी १ लाख ५० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून रायगड जिल्हा परिषद अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक तथा जिल्हा परिषदेच्या वित्त विभागातील वित्त लेखा सहाय्यक योगेश प्रकाश भस्मे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) रायगड पथकाने बुधवारी (२३ सप्टेंबर) सायंकाळी रंगेहाथ पकडले. सायंकाळी साडेचारच्या सुमारास ठरलेल्या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली.
तक्रारदाराच्या पत्नीची बदली करून देण्यासाठी भस्मे यांनी दीड लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने त्याची पडताळणी केली. मागणीची पडताळणी झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी सापळा रचला.
बुधवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास ठरलेल्या ठिकाणी तक्रारदाराकडून १ लाख ५० हजार रुपयांची रक्कम स्वीकारत असताना एसीबीच्या पथकाने योगेश भस्मे यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. या कारवाईनंतर प्रकरणातील पुढील कायदेशीर कारवाई आणि तपास एसीबीकडून सुरू आहे.
योगेश भस्मे हे रायगड जिल्हा परिषदेच्या वित्त विभागात वित्त लेखा सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. त्याचबरोबर त्यांच्याकडे रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांचे स्वीय सहाय्यक म्हणूनही जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधातील या कारवाईमुळे जिल्हा परिषद प्रशासनात खळबळ उडाली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, रायगड जिल्हा परिषदेअंतर्गत सध्या शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे. तक्रारदार शिक्षकाला त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी किंवा अपेक्षित बदल करून प्रशासकीय सूट मिळवून देण्यासाठी योगेश भस्मे यांनी 1 लाख 50 हजार रुपयांच्या रकमेची मागणी केली होती. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी या संदर्भात तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) रायगड यांच्याकडे अधिकृत तक्रार नोंदवली.
दरम्यान, तक्रारदाराच्या पत्नीच्या बदलीच्या कामासाठी लाचेची मागणी करण्यात आल्याचा आरोप असल्याने या बदली प्रक्रियेत भस्मे यांची नेमकी भूमिका काय होती, तसेच बदलीच्या निर्णयावर प्रभाव टाकण्याचा त्यांना अधिकार होता का, यासह या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास एसीबीकडून केला जाणार आहे.
या कारवाईबाबत एसीबीकडून अधिकृत तपशील आणि पुढील कायदेशीर कारवाईनंतर प्रकरणातील इतर बाबी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.


