(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील चरवेली गावचे सुपुत्र आणि प्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक प्रकाश गंगाराम सावंत यांना सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल यंदाच्या राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संविधान अमृत महोत्सवानिमित्त अहिल्यानगर येथे आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर येथे तेजस सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कार्यक्रमात प्रकाश सावंत यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी माजी महसूलमंत्री बाबासाहेब थोरात, प्रसिद्ध विधीतज्ज्ञ व आमदार सुधीर तांबे, डॉ. मुकुंद भारसाकळे, संघराज रुपवते, अकोलेचे आमदार डॉ. किरण लाहामटे आदी मान्यवर उपस्थित होते.
नाट्यदिग्दर्शक तसेच सामाजिक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते असलेल्या प्रकाश सावंत यांनी विविध लोकप्रबोधनाच्या माध्यमांतून भारतीय संविधानातील मूल्यांचा प्रचार-प्रसार, सामाजिक जनजागृती तसेच विविध लोककलात्मक आणि सांस्कृतिक कार्यक्रम सातत्याने राबविले आहेत. त्यांचे हे कार्य त्यागी आणि निस्वार्थी भावनेने सुरू असून, या कामाची दखल घेत त्यांना ‘महाराष्ट्र रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा प्रतिष्ठेचा सन्मान त्यांनी शिल्पकार सेवा संघ ग्रामीण चरवेली, गावातील सर्व ग्रामस्थ, विविध धार्मिक व सामाजिक संस्था, सांस्कृतिक कला मंच, कुटुंबीय, नातेवाईक आणि हितचिंतक यांना समर्पित केला. भविष्यातही सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि जनजागृतीपर कल्याणकारी क्षेत्रात अधिक जोमाने कार्य करण्याचा मनोदय प्रकाश सावंत यांनी व्यक्त केला.
त्यांच्या या सन्मानाबद्दल विविध क्षेत्रांतील मान्यवर, हितचिंतक तसेच धम्म बांधवांनी प्रकाश सावंत यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच या पुरस्काराबद्दल तक्षशिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, पाली यांच्या वतीनेही प्रकाश सावंत यांचा नुकताच जाहीर सत्कार करण्यात आला.


