(राजापूर-कशेळी / वार्ताहर)
आवळीची वाडी क्रिकेट संघ, मुंबई यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य गणपती सजावट स्पर्धा २०२६ चा निकाल जाहीर झाला आहे. गणेशोत्सवानिमित्त आयोजित या स्पर्धेला वाडीतील गणेशभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध सामाजिक, धार्मिक आणि पर्यावरणपूरक संकल्पना साकारत स्पर्धकांनी आपल्या कलात्मकतेचे आणि कल्पकतेचे दर्शन घडविले.
सजावट, संकल्पना, कलात्मकता, नावीन्य आणि सादरीकरण या निकषांच्या आधारे परीक्षक मंडळाने विजेत्यांची निवड केली. स्पर्धेत श्री. प्रसाद गणपत माळी यांनी साकारलेल्या ‘पंढरीची वारी’ या सजावटीने प्रथम क्रमांक पटकावला. श्री. मधुकर पांडुरंग राडये यांच्या ‘रामसेतू उभारणी’ या सजावटीला द्वितीय क्रमांक, तर श्री. नामदेव रामचंद्र वारीशे यांच्या ‘टाकाऊपासून टिकाऊ — कागदी लगदीपासून आकाश व इंद्रधनुष्य निर्मिती’ या सजावटीला तृतीय क्रमांक मिळाला.
या स्पर्धेच्या माध्यमातून गणेशोत्सवातील कलात्मकता, सामाजिक संदेश तसेच पर्यावरणपूरक सजावटीला प्रोत्साहन मिळाले. स्पर्धकांनी विविध संकल्पना प्रभावीपणे साकारत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी परीक्षक, मान्यवर, सहभागी स्पर्धक तसेच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आवळीची वाडी क्रिकेट संघ, मुंबई यांच्या वतीने आभार मानण्यात आले. “एकीच आपली ताकद, क्रिकेट आपली ओळख!” या भावनेतून सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबविण्याचा संघाचा प्रयत्न यापुढेही सुरू राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.


