(रत्नागिरी)
दसऱ्यानंतरच्या दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर रत्नागिरीकरांनी वाहन खरेदीसाठी मोठी झेप घेतली असून, जिल्ह्यातील वाहन विक्रेत्यांकडे तब्बल गर्दी उसळल्याचे चित्र दिसले. जीएसटीचे दर कमी झाल्याने वाहन खरेदीला अधिक चालना मिळाली असून, यामुळे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) महसुलात मोठी वाढ झाली आहे.
दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर २,०५० वाहनांची नोंदणी करण्यात आली असून, त्यातून ७ कोटी ३३ लाख ४९ हजार ९२८ रुपयांचा शासकीय महसूल प्राप्त झाला आहे. त्यापैकी ७ कोटी ४ लाख ४७ हजार ९२८ रुपये हे नोंदणी शुल्क व करातून, तर २८ लाख ९३ हजार रुपये हे आकर्षक क्रमांकांच्या नोंदणीमधून मिळाले. दसरा आणि दिवाळी या सणासुदीच्या काळात दुचाकी, चारचाकी तसेच मालवाहतूक वाहनांची विक्री लक्षणीय प्रमाणात वाढल्याचे आरटीओ विभागाकडून सांगण्यात आले. नागरिकांना वेळेत वाहने मिळावीत म्हणून रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन विभागाने विशेष नियोजन करून नोंदणी प्रक्रिया गतीमान केली.
सरकारकडून जीएसटी दरकपातीनंतर वाहनांच्या किमतीत झालेली घट ही या वाढीमागील प्रमुख कारणांपैकी एक ठरली आहे. त्यामुळे दसऱ्यापासूनच वाहन विक्रीला गती मिळाली आणि दिवाळीत ती शिगेला पोहोचली. यंदाही ‘आकर्षक नोंदणी क्रमांकां’साठी नागरिकांचा ओढा कायम राहिला. २७४ वाहनांनी विशेष क्रमांकांची निवड केली असून, त्यातून जवळपास २९ लाख रुपयांचा अतिरिक्त महसूल विभागाला प्राप्त झाला आहे.

