(राजापूर / तुषार पाचलकर)
पाचल ग्रामपंचायत हद्दीत गेल्या काही दिवसांपासून गंभीर जखमी अवस्थेतील एक बैल मोकाट फिरत असल्याने ग्रामस्थांमध्ये चिंता आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. पाचल बाजारपेठेसह परिसरात हा बैल जखमी अवस्थेत फिरत असून त्याच्या शरीरावरील जखमा दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून दिले होते.
स्थानिक ग्रामस्थांनी बैलाच्या दयनीय अवस्थेबाबत चिंता व्यक्त करत त्याच्यावर तातडीने उपचार करण्याची मागणी केली होती. या संदर्भातील एक पोस्ट काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संबंधित बैल हा मूळ पांगरी गावचा व सध्या विद्यानगर, पाचल येथे वास्तव्यास असलेल्या श्रीधर जाधव यांच्या मालकीचा असल्याची माहिती समोर आली.
घटनेची गंभीर दखल घेत पाचल ग्रामपंचायतीचे सरपंच बाबालाल फरास यांनी संबंधितांना लेखी नोटीस बजावली. मात्र, या प्रकरणात नेमकी कारवाई कोणत्या विभागाने करावी याबाबत संभ्रम निर्माण झाल्याने प्रशासनाची भूमिका केवळ बघ्याचीच राहिल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
दरम्यान, गावातील काही तरुणांनी या जखमी बैलाला पकडण्याचा निर्धार केला. शनिवारी भर दुपारी कडक उन्हात त्यांनी बैलाला पकडण्यासाठी मोहीम सुरू केली. रात्री ९ वाजेपर्यंत प्रयत्न सुरू राहिले, मात्र यश मिळाले नाही. या मोहिमेत विपुल वायकुळ, वैभव खटावकर, सौरभ नारकर, विन्मिष कुडतडकर, सर्वेश खानविलकर, श्रवण तेलंग, धन्याशेठ ताम्हणकर, तुषार पाचलकर, सोहन सुतार, हर्षल बेर्डे, ओम रसाळ, आर्यन वायकुळ, विहंग खानविलकर, समीर खानविलकर, प्रेम, वीर यांच्यासह सुमारे २० हून अधिक तरुण सहभागी झाले होते.
एक दिवस उलटल्यानंतर पाचलचे सिताराम बावदाणे यांनी सोशल मीडियावर या विषयाला पुन्हा वाचा फोडली. त्यानंतर झालेल्या चर्चेतून आव्हान स्वीकारत मुंबईत स्थायिक असलेले सिताराम बावदाणे आणि त्यांची टीम दुसऱ्याच दिवशी गावात दाखल झाली. घरी न जाता त्यांनी थेट जखमी बैलाला पकडण्याचे लक्ष्य निश्चित केले आणि अखेर अथक प्रयत्नांनंतर बैलाला पकडण्यात यश मिळवले.
या मोहिमेत सिताराम बावदाणे, संदीप झोरे, दुलाजी कोकरे, तुषार कोकरे, आनंद शिंदे, संतोष माने आणि राजा झोरे यांचा सक्रिय सहभाग होता. अनेक दिवस पाचल परिसरात धुमाकूळ घालणारा आणि जखमी अवस्थेत फिरणारा बैल पकडण्यात आल्याने गावभर या कार्याची चर्चा रंगली असून सिताराम बावदाणे व त्यांच्या सहकाऱ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
बैलाला पकडल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अतिश शिंदे, परिचर संदेश सावंत आणि ड्रेसर राजेंद्र कांबळे यांनी त्याच्यावर आवश्यक उपचार केले. त्यानंतर बैलाला त्याच्या मालकाच्या स्वाधीन करण्यात आले.
विशेष म्हणजे, बैलाला पकडून देणाऱ्यास पाच हजार रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा मालक श्रीधर जाधव यांनी यापूर्वी केली होती. दिलेल्या शब्दाप्रमाणे त्यांनी बक्षीस तर दिलेच, शिवाय स्वखुशीने अधिक रक्कम देत आपल्या दिलदार स्वभावाचीही प्रचिती घडवून आणली. बैलाला जीवदान देणाऱ्या सर्व तरुणांचे आणि उपचार करणाऱ्या वैद्यकीय पथकाचे परिसरातून अभिनंदन होत आहे.

