(संगमेश्वर /प्रतिनिधी)
देवरुख–रत्नागिरी मार्गावरील आंबव येथे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात रानगव्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या साडवली येथील तरुण स्वप्नील पेडामकर याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेनंतर पेडामकर कुटुंबीयांना वनविभागाकडून देण्यात येणारी १० लाख रुपयांची आर्थिक मदत बुधवारी त्यांच्या आईकडे धनादेशाद्वारे सुपूर्द करण्यात आली.
रत्नागिरी–चिपळूण विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक प्रियांका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली मदतनिधीचे हस्तांतरण करण्यात आले. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जीव गमावलेल्या कुटुंबाला शासनाच्या नियमानुसार मिळणाऱ्या मदतीमुळे पेडामकर कुटुंबाला या कठीण प्रसंगी काहीसा आर्थिक आधार मिळाला आहे. स्वप्नील पेडामकर याच्यावर उपचार सुरू असतानाच कुटुंबीयांना शासकीय मदत लवकर मिळावी, यासाठी आमदार किरण सामंत आणि आमदार शेखर निकम यांनी पाठपुरावा केल्याचे सांगण्यात आले. घटनेनंतर मदतीची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी संबंधित यंत्रणेकडे पाठपुरावा करण्यात आला होता.
धनादेश सुपूर्द करताना परिक्षेत्र वन अधिकारी (रत्नागिरी) विक्रम गुरव, संगमेश्वर–देवरुखचे वनपाल सागर गोसावी, वनरक्षक सहयोग कराडे (साखरपा), आकाश कडूकर (फुणगुस), सुरज तेली (आरवली), सुप्रिया काळे (दाभोळे) यांच्यासह वनविभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सुरेश उर्फ बारक्याशेठ बने, पप्पू नाखरेकर, संजय लाड, पापा शेठ भिंगार्डे, बंधू सुर्वे, विनोद वाडकर, सचिन मांगले, प्रमोद सुर्वे, निलेश भुवड, भाई चव्हाण, विशाल भानुशाली यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
वनविभागाकडून मिळालेल्या आर्थिक मदतीमुळे पेडामकर कुटुंबाला काहीसा दिलासा मिळाला असला, तरी स्वप्नीलच्या अकाली निधनाने साडवलीसह देवरुख परिसरात अजूनही हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेनंतर मानवी वस्तीच्या आसपास वाढणारा वन्यप्राण्यांचा वावर आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
दहीहंडीचा निधी उपचारासाठी
दरम्यान, या घटनेने व्यथित झालेल्या स्थानिक सह्याद्री नगर मित्रमंडळाने यंदाचा पारंपरिक दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. उत्सवासाठी नियोजित निधी स्वप्नीलच्या उपचारासाठी देण्यात आला. मात्र, उपचार सुरू असतानाच स्वप्नीलची प्राणज्योत मालवली. त्याच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत मित्रमंडळाने घेतलेला हा निर्णय परिसरात संवेदनशीलतेचे उदाहरण ठरला आहे.


