(संगमेश्वर /प्रतिनिधी)
तालुक्यात रानगव्यांचा वाढता वावर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी गंभीर आव्हान ठरत असतानाच आता या वन्यप्राण्यांनी थेट देवरुख शहराच्या हद्दीत प्रवेश केल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी सकाळी शहरातील बोटकेवाडी परिसरात एकाच वेळी दोन रानगवे आढळून आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. नागरी वस्तीत सकाळच्या वेळीच रानगव्यांचा मुक्त संचार सुरू झाल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून संगमेश्वर तालुक्यात रानगव्यांचा वावर वाढला आहे. जंगलालगतच्या वस्त्यांमध्ये तसेच मानवी वस्तीच्या परिसरात त्यांचा वारंवार वावर आढळून येत असल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी रानगव्याच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर देवरुख शहरात दोन रानगवे आढळून येणे ही बाब वनविभागासाठीही गांभीर्याने घेण्याची गरज निर्माण करणारी आहे. बोटकेवाडी परिसरात दोन रानगवे दिसल्याची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी सतर्कता बाळगण्यास सुरुवात केली. सकाळच्या वेळेस नागरिकांची आणि वाहनांची वर्दळ असलेल्या परिसरात वन्यप्राण्यांचा वावर आढळल्याने संभाव्य दुर्घटनेची भीती व्यक्त होत आहे.
या घटनेची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकार कार्यकर्ते शेखर जोगळेकर यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधला. संगमेश्वर तालुका तसेच देवरुख परिसरात रानगव्यांचा वाढता वावर लक्षात घेता वनविभागाने केवळ घटना घडल्यानंतर हालचाल न करता प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नागरी वस्तीत रानगवे आढळून येत असल्याने त्यांचा सुरक्षितपणे जंगलाच्या दिशेने मार्ग वळविण्यासाठी वनविभागाचे विशेष पथक तैनात करावे. तसेच रानगव्यांच्या संभाव्य हालचालींच्या ठिकाणी नियमित गस्त वाढवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. नागरिकांनी वन्यप्राण्यांच्या जवळ जाऊ नये, त्यांना डिवचू नये अथवा गर्दी करू नये, याबाबतही व्यापक जनजागृती करण्याची आवश्यकता आहे.
रानगव्यांच्या वावराची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाकडून केवळ त्यांना हुसकावून लावण्यापुरती कारवाई करून चालणार नाही. मानवी वस्ती आणि वन्यजीव यांच्यातील वाढता संघर्ष रोखण्यासाठी रानगव्यांच्या हालचालींचा अभ्यास, संवेदनशील भागांची निश्चिती, नागरिकांना सतर्क करण्याची यंत्रणा आणि वनकर्मचाऱ्यांची नियमित गस्त अशा उपाययोजनांची गरज आहे. काही दिवसांपूर्वी घडलेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आता देवरुख शहरातच रानगव्यांचा शिरकाव झाल्याने वनविभागाने आणखी एका दुर्घटनेची प्रतीक्षा करू नये. नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना होतील का, हा प्रश्न आता वनविभागासमोर आहे. बोटकेवाडीतील या घटनेनंतर वनविभाग कोणती तातडीची आणि ठोस पावले उचलतो, याकडे देवरुख शहरासह संपूर्ण संगमेश्वर तालुक्याचे लक्ष लागले आहे.


