(राजापूर / वार्ताहर)
गेल्या दोन वर्षांत बँकेसमोर निर्माण झालेल्या आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करताना सभासदांचा विश्वास, अधिकारी-कर्मचारी वर्ग तसेच सहकारी संचालकांचे भक्कम पाठबळ मिळाल्याने राजापूर अर्बन बँकेने पुन्हा प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. सभासदांचे हित जोपासत बँकेचे कामकाज अत्यंत पारदर्शक पद्धतीने करून बँकेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही बँकेचे अध्यक्ष एड. शशिकांत सुतार यांनी दिली.
राजापूर अर्बन बँकेची १०५ वी सर्वसाधारण सभा रविवार, २७ सप्टेंबर रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या आर्थिक वर्षातील बँकेच्या कामकाजाचा लेखाजोखा एड. सुतार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत मांडला. सन २०२५-२६ हे वर्ष बँकेसाठी काहीसे आव्हानात्मक ठरले. थकीत कर्जे, वाढलेला एन.पी.ए. आणि त्यानुसार करावी लागलेली नियामक तरतूद याचा अंतिम आर्थिक निकालावर परिणाम झाला. मात्र, बँकेच्या नियमित बँकिंग व्यवसायातून सुमारे २ कोटी रुपयांचा ढोबळ नफा झाला आहे. त्यामुळे बँकेच्या मूळ बँकिंग व्यवसायातून उत्पन्न निर्माण करण्याची क्षमता कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एन.पी.ए. संदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांनुसार ७.५० कोटी रुपयांपेक्षा अधिक तरतूद करावी लागल्याने अंतिम ताळेबंदात बँकेला तोटा दिसत आहे. त्यामुळे एन.पी.ए. कमी करणे आणि थकीत कर्जाची वसुली करणे हे बँकेसमोरील प्रमुख आव्हान असल्याचे एड. सुतार यांनी सांगितले. एप्रिल २०२६ पासून आजपर्यंत बँकेने सुमारे १३ कोटी रुपयांची वसुली केली असून, ही वसुली बँकेच्या वसुली मोहिमेतील महत्त्वाची कामगिरी असल्याचे त्यांनी नमूद केले. थकीत कर्जदारांविरुद्ध आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, सुमारे ५१ कोटी रुपयांच्या थकीत कर्जासाठी वसुली दावे दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय संबंधित प्रकरणांमध्ये कायदेशीर नोटिसा, पाठपुरावा आणि उपलब्ध कायदेशीर तरतुदींनुसार आवश्यक कारवाई केली जात आहे.
बँकेच्या ढोबळ एन.पी.एमध्येही सुधारणा झाल्याचे अध्यक्षांनी सांगितले. मार्च २०२६ अखेर बँकेचा ढोबळ एन.पी.ए. सुमारे ६१.२९ कोटी रुपये होता. वसुली, खात्यांचे नियमितीकरण आणि विविध उपाययोजनांमुळे ऑगस्ट २०२६ अखेर तो सुमारे ५२.६० कोटी रुपयांवर आला आहे. या कालावधीत एन.पी.एमध्ये जवळपास १९ कोटी रुपयांची घट झाल्याचे बँकेकडून सांगण्यात आले.
आर्थिक परिस्थिती आव्हानात्मक असतानाही ठेवीदार आणि सभासदांनी बँकेवरील विश्वास कायम ठेवला, ही महत्त्वाची बाब असल्याचे एड. सुतार यांनी नमूद केले. ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण हे बँकेचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या काळातील अनुभव लक्षात घेऊन नवीन कर्जवाटप करताना बँकेने अत्यंत सावध भूमिका घेतली आहे. केवळ कर्जवाढ करण्याऐवजी गुणवत्तापूर्ण कर्जवाढीवर भर दिला जात आहे. कर्जदाराची परतफेड क्षमता, कर्जाचा उद्देश, सुरक्षा तसेच नियमानुसार आवश्यक तपासणी यांचा योग्य विचार करूनच कर्जवाटप केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या काळात सभासदांना लाभांश देण्यात आला होता. मात्र, गेली दोन वर्षे बँक तोट्यात असल्याने लाभांश देता आलेला नाही. पुढील वर्षी बँकेला नफ्यात आणून सभासदांना लाभांश देण्याचा निर्धार असल्याचे एड. सुतार यांनी सांगितले. मोठ्या प्रमाणावर कर्जवसुली करणे, ढोबळ व निव्वळ एन.पी.ए. सातत्याने कमी करणे, गुणवत्तापूर्ण कर्जवाढ करणे आणि खर्चावर नियंत्रण ठेवून ढोबळ नफा वाढवणे या उद्दिष्टांवर बँक काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कर्जवसुलीसाठी सहकार कायदा १९६० मधील कलम १०१ अंतर्गत १६४ दावे, कलम ९१ अंतर्गत २८५ दावे, सिक्युरिटायझेशन अॅक्ट-४ अंतर्गत तसेच निगोसिएबल इन्स्ट्रुमेंट अॅक्टच्या कलम १३८ अंतर्गत १ दावा, असे सुमारे ५१ कोटी रुपयांच्या कर्जवसुलीसाठी दावे दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. बँकेने दहा लाख रुपयांपर्यंत कर्जपुरवठा सुरू केला असून स्वतःची क्यूआर कोड सुविधाही सुरू केली आहे.
नातेवाईकांच्या थकीत कर्जप्रकरणी एका संचालकावर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. तसेच दहा वर्षांपेक्षा अधिक काळ संचालकपद भूषविणाऱ्या संचालकांबाबत सहकार विभाग आणि आरबीआयकडून माहिती मागविण्यात आल्याचे एड. सुतार यांनी सांगितले.
सभासद, ठेवीदार, ग्राहक, कर्मचारी आणि संचालक मंडळ यांच्या सामूहिक सहकार्याने राजापूर अर्बन बँक पुन्हा अधिक सक्षम, आर्थिकदृष्ट्या मजबूत आणि विश्वासार्ह सहकारी बँक म्हणून गतवैभव प्राप्त करेल, असा विश्वास एड. शशिकांत सुतार यांनी व्यक्त केला.
या पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष विवेक गादीकर, संचालक अनिल करंगुटकर, राजेंद्र कुशे, दिनानाथ कोळवणकर, विजय पाध्ये, प्रसाद मोहरकर, प्रतिभा रेडीज, सीईओ शेखरकुमार अहिरे, अधिकारी लक्ष्मण म्हात्रे, रमेश काळे, प्रसन्न खांबे आदी उपस्थित होते.


