(संगमेश्वर/ प्रतिनिधी)
विघ्रवली-माळवाडी येथील पालकर फाऊंडेशनच्या कार्यालयातील काउंटरमधून ५० हजार २०० रुपयांची रोकड चोरीला गेल्याची घटना १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणी देवरुख पोलिस ठाण्यात राकेश एकनाथ मेस्त्री (वय ३२, रा. काटवली-ढोसळवाडी, ता. संगमेश्वर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पालकर फाऊंडेशन विभागात ज्येष्ठ नागरिकांकडून जमा झालेली एकूण ७८ हजार ८०० रुपयांची रक्कम ठेवण्यात आली होती. त्यापैकी ५० हजार २०० रुपयांची रोकड काउंटरमधून चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. चोरीस गेलेल्या रकमेत ५०० रुपयांच्या १०० नोटा आणि २०० रुपयांची एक नोट असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. ही घटना १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पालकर फाऊंडेशन, विघ्रवली-माळवाडी येथे घडली. या प्रकरणी फाऊंडेशनचे मॅनेजर श्रीकृष्ण धोंड पालेकर (वय ४४) यांनी देवरुख पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी राकेश मेस्त्री याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ३०३ व ३०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. संबंधित कलमांचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या माध्यमातून जमा झालेल्या रकमेतील मोठी रक्कम चोरीला गेल्याने या घटनेची परिसरात चर्चा सुरू आहे. चोरीची रक्कम नेमकी कशा प्रकारे लंपास करण्यात आली, याचा तपास देवरुख पोलिसांकडून सुरू आहे.


