( चिपळूण )
चिपळूणचे माजी आमदार बापूसाहेब खेडेकर यांच्या पत्नी श्रीमती कुंदाताई खेडेकर यांचे आज (मंगळवार, दि. ६ जानेवारी २०२६ रोजी) श्री क्षेत्र वाराणसी येथे हृदयविकाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्या ७१ वर्षांच्या होत्या.
कुंदाताई खेडेकर या सामाजिक, शैक्षणिक आणि महिला संघटनांच्या कार्यात सक्रिय होत्या. वैश्य समाज, चिपळूण तसेच श्रीराम एज्युकेशन सोसायटी या संस्थांमध्ये त्यांनी विश्वस्त म्हणून जबाबदारी पार पाडली. प्रगती महिला मंडळाच्या अध्यक्षा म्हणूनही त्यांनी प्रभावी नेतृत्व केले. सामाजिक कार्यातील त्यांच्या सहभागामुळे त्या चिपळूण परिसरात सर्वदूर परिचित होत्या.
त्यांच्या पश्चात दोन पुत्र, एक कन्या तसेच खेडेकर कुटुंबातील आप्तस्वकीय असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे चिपळूण शहरात तसेच सामाजिक क्षेत्रात तीव्र शोक व्यक्त करण्यात येत आहे.

