(चिपळूण /प्रतिनिधी)
दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अपेक्षा अमोल चव्हाण (४०, धामापूर, ता. संगमेश्वर) यांचा मृतदेह गुरुवारी (२५ सप्टेंबर) दुपारी १२.३० वाजता वाशिष्ठी नदीपात्रात मजरेकाशी परिसरात आढळून आला. चिपळूण पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने सलग दोन दिवस राबवलेल्या शोधमोहिमेत अखेर अपेक्षा चव्हाण यांचा मृतदेह सापडला.
कामथे उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपेक्षा चव्हाण या दोन दिवसांपूर्वी घरातून कोणालाही काही न सांगता बाहेर पडल्या होत्या. त्यानंतर त्यांचा मोबाइल लोकेशन चिपळूण शहरात आढळले. गांधारेश्वर पुलावर त्यांचा मोबाइल, पर्स आणि चप्पल मिळाल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. चिपळूण पोलिसांनी तातडीने बेपत्ता नोंद घेऊन शोधमोहीम सुरू केली.
दरम्यान, पोलिस व स्थानिकांनी वाशिष्ठी नदीपात्रासह रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. मात्र अपेक्षा कुठेच दिसून आल्या नव्हत्या. गुरुवारी पुन्हा सुरू झालेल्या शोधात मजरेकाशी किनाऱ्याजवळ त्यांचा मृतदेह आढळला. अपेक्षा चव्हाण यांच्या मृत्यूमागील नेमका प्रकार अद्याप स्पष्ट झालेला नसून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.

