(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
जिल्ह्यात अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात सुरू असलेल्या मोहिमेला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आणखी एक यशस्वी छापा जोडला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांनी दिलेल्या विशेष सूचनेनुसार कोकणनगर परिसरात संशयित हालचालींवर पाळत ठेवताना पथकाने मोठी कारवाई केली.
८ डिसेंबर २०२५ रोजी पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानीक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना कोकणनगर कब्रस्तानाशेजारील मोकळ्या जागेत हातात कॅरीबॅग घेऊन उभा असलेला एक इसम संशयास्पद स्थितीत दिसला. पोलिसांचे लक्ष त्याच्या हालचालींकडे जाताच तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. तथापि, पथकाने त्याला योग्य बळाचा वापर करून दुपारी २.३० वा. पंचांसमक्ष ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव रईस सईद खान (वय ३२, रा. घर नं. ३९०, मराठी शाळेसमोर, कोकणनगर, रत्नागिरी) असे सांगितले. त्याची अंगझडती घेताना पिवळ्या कॅरीबॅगमध्ये १३ पारदर्शक पिशव्यांमध्ये पॅक केलेला एकूण २०४ ग्रॅम वजनाचा काळपट-हिरवट ‘गांजा’ सदृश अंमली पदार्थ, एक डिजिटल वजनकाटा, दोन मोबाईल फोन आणि ₹३,५०० रोख रक्कम असा अंदाजे ₹४९,७००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
रईस खान हा उक्त अमली पदार्थ गैरकायदेशीररित्या विक्रीसाठी बाळगत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 454/2025 अन्वये एनडीपीएस कायदा 1985 चे कलम 8(क), 20(ब) ii (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शहर पोलीस ठाण्याकडून सुरू आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वात पार पडली. या कारवाईत स.पो.नि. शबनम मुजावर (प्रभारी अधिकारी, महिला कक्ष), श्रे. पो.उनि. संदीप ओगले, पो.हवा विजय आंबेकर, पो.हवा योगेश नार्वेकर, पो.हवा दिपराज पाटील आदींचा सक्रिय सहभाग होता.

