(रत्नागिरी / प्रतिनिधी)
यंदाच्या पावसाळ्यात सुरुवातीपासूनच पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील पावसाळी हंगाम कोरडाच राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत सातत्याने हजेरी लावणाऱ्या पावसाने यंदा मात्र मोठी दडी मारली. पावसाचा हंगाम संपण्यापूर्वीच तापमानाचा पारा चढू लागल्याने नागरिकांना आतापासूनच ‘ऑक्टोबर हीट’च्या झळा जाणवू लागल्या आहेत. कमाल तापमानाबरोबरच किमान तापमानातही सुमारे अडीच ते तीन अंश सेल्सिअसने वाढ झाल्याने आगामी काळातील उष्णतेची तीव्रता अधिक जाणवण्याची शक्यता आहे.
यंदा पावसाने सुरुवातीपासूनच लहरीपणाचा प्रत्यय दिला. गतवर्षी मे महिन्याच्या उत्तरार्धात झालेल्या पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. त्यानंतर जून-जुलैमध्ये पावसाने ओढ दिली असली तरी ऑगस्टपासून त्याने काही प्रमाणात सातत्य राखले. गतवर्षी १४ ऑक्टोबरपर्यंत पावसाच्या सरी कोसळत राहिल्याने सरासरीच्या सुमारे ९० टक्के पाऊस झाला तरी पाणीटंचाईची तीव्रता तुलनेने कमी राहिली होती. यंदा मात्र जूनपासूनच पावसाने असहकार पुकारल्याने परिस्थिती वेगळी आहे.
जिल्ह्यात यंदा कुठेही सलग मुसळधार पावसाचा अनुभव फारसा आला नाही. ऐन पावसाळ्यातही ऊन-पावसाचा खेळ सुरू राहिल्याने वातावरणात अपेक्षित गारवा निर्माण झाला नाही. उलट उन्हाची तीव्रता वाढत गेल्याने उष्णतेची झळ जाणवू लागली. कमी पावसाचा परिणाम शेतीबरोबरच जलसाठ्यांवरही होण्याची भीती निर्माण झाली आहे. दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीच्या टप्प्यातच जिल्ह्यातील प्रमुख नद्यांना अनेकदा पूर येत असतो. यंदा मात्र जगबुडी नदीचा अपवाद वगळता अन्य नद्यांच्या पात्रातील पाणीपातळी तुलनेने नियंत्रणातच राहिली. आता उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने नद्या, तलाव आणि धरणांमधील पाणीसाठ्यातही झपाट्याने घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पावसाची हजेरी अपेक्षित असते. मात्र, यंदा सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यातच पावसाने विश्रांती घेतली आहे. तुरळक हलक्या सरी वगळता पावसाचे अस्तित्व नगण्य राहिल्याने दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे. सप्टेंबरमध्ये रत्नागिरीतील कमाल तापमान साधारणपणे २९ ते ३० अंश सेल्सिअसच्या आसपास राहते. यंदा मात्र कमाल तापमान ३२ ते ३३ अंशांपर्यंत पोहोचले आहे. किमान तापमानही साधारण २३ ते २४ अंशांदरम्यान असताना आता ते २६.५ अंश सेल्सिअसपर्यंत गेले आहे. कमाल आणि किमान अशा दोन्ही तापमानात झालेली वाढ त्यामुळे विशेष जाणवत आहे. पावसाळ्याचा निरोप होण्यापूर्वीच उष्णतेने डोके वर काढल्याने नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. आगामी काळात पावसाची स्थिती आणि तापमानातील चढ-उतार कसे राहतात, याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


