(दापोली / रत्नागिरी)
दाभोळ येथील ७० वर्षीय महिलेचा कावीळ आजारावर उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना २० सप्टेंबर रोजी घडली. सुनिता बबन मांडवकर (वय ७०, रा. दाभोळ दालभेश्वर पाखाडी, ता. दापोली, जि. रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिस नोंदीनुसार, सुनिता मांडवकर यांना जुलाब होऊन अंगातील ताप वाढू लागल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी २० सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे ९ वाजता उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, दापोली येथे दाखल केले.
रुग्णालयात रक्त तपासणी करण्यात आल्यानंतर त्यांना कावीळ असल्याचे निदान झाले. त्यानुसार वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. या घटनेची नोंद दाभोळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक १०/२०२६, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये करण्यात आली आहे. घटनेबाबत पुढील कार्यवाही दाभोळ पोलिसांकडून करण्यात येत आहे.


