(रत्नागिरी /प्रतिनिधी)
लोककवी डॉ. वामनदादा कर्डक यांच्या १०४व्या शतकोत्तर जयंतीनिमित्त दान पारमिता आणि लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान, नाशिक यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या ‘धम्मलिपी–लेणी, पालीभाषा साहित्य संगिती’ संमेलनात रत्नागिरीचे विजय य. जाधव यांनी धम्मलिपी स्पर्धेत चतुर्थ क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले.
२० ऑगस्ट रोजी झालेल्या या संमेलनात कविता, चित्रकला तसेच धम्मलिपी अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. धम्मलिपी स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध भागांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यातून उत्कृष्ट पाच स्पर्धकांची निवड करण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यातून सहभागी झालेल्या विजय जाधव यांनी अशोककालीन आणि सातवाहनकालीन धम्मलिपीच्या अभ्यासाच्या बळावर चतुर्थ क्रमांक पटकावला. सुप्रसिद्ध बौद्ध साहित्यिक व विचारवंत मोतीलाल आलमचंद्र आणि बौद्ध साहित्यिक व अभ्यासक अतुल भोसेकर यांच्या हस्ते जाधव यांना अशोकस्तंभाची प्रतिकृती आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यात पाली भाषा, तसेच अशोककालीन व सातवाहनकालीन धम्मलिपीच्या अभ्यासासाठी प्रा. दिलीप वासनिक यांनी सुरू केलेल्या अभ्यासवर्गाचा या यशात महत्त्वाचा वाटा आहे. विजय जाधव यांनी ‘डिप्लोमा इन पाली’ हा अभ्यासक्रम पूर्ण केला असून धम्मलिपीचाही अभ्यास केला आहे.
भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून विविध जबाबदाऱ्या सांभाळत जाधव यांनी बौद्धाचार्य, श्रामणेर आणि केंद्रीय शिक्षक म्हणूनही कार्य केले आहे. प्रवचनकार म्हणूनही ते परिचित असून, संस्थेच्या माध्यमातून धम्म चळवळीला गती देण्याचे काम त्यांनी केले आहे. या संमेलनात पालीभाषा, धम्मलिपी, लेणी, स्तूप आणि शिलालेख यांच्या संवर्धनाची गरज अधोरेखित करण्यात आली. बुद्धकाळात पाली ही लोकभाषा होती. त्यामुळे पालीभाषेचा अधिक व्यापक प्रचार-प्रसार करून ती ज्ञानभाषा म्हणून विकसित करण्याची गरज वक्त्यांनी व्यक्त केली.
अतुल भोसेकर यांनी केवळ बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मांडण्यापेक्षा ते जीवनात आचरणात आणणे गरजेचे असल्याचे सांगितले. धम्म चळवळीला गतिमान करण्यासाठी तरुण पिढीने सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले. अभिनेते व पार्श्वगायक नंदेश उमप यांनी सम्राट अशोकाने निर्माण केलेले स्तूप, शिलालेख, लेणी आणि धम्मागारे यांचा अभ्यास करणे ही सर्वांची नैतिक जबाबदारी असल्याचे सांगितले. अभिनेत्री गार्गी निळू फुले यांनी बुद्धविचार आणि तत्त्वज्ञान ही जगाला मिळालेली अमूल्य देणगी असून, पालीभाषा, लेणी व शिलालेख हा आपला इतिहास असल्याचे नमूद केले.
पाली भाषा अभ्यासक प्रा. विजय मोहिते यांनी पालीभाषेचे जतन व संवर्धन करून ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याची गरज व्यक्त केली. मोतीलाल आलमचंद्र यांनी पालीभाषा ही बुद्धांच्या शिकवणीचा मूलभूत आधार असल्याचे सांगून शिलालेख आणि लेण्यांमधील प्राचीन वारशावर अधिक संशोधन करण्याचे आवाहन केले. संमेलनात देशातील विविध राज्यांत तसेच केंद्राच्या माध्यमातून बौद्ध धम्म विद्यापीठांची स्थापना करावी, धम्मलिपीचा उल्लेख सर्वत्र ‘धम्मलिपी’ असा करावा, लेणी व शिलालेखांची सविस्तर माहिती देणारे फलक आणि क्यूआर कोड बसवावेत, लेणी संवर्धनासाठी स्वतंत्र निधी द्यावा, अशा विविध मागण्यांचे ठराव करण्यात आले.
माध्यमिक शाळा व महाविद्यालयांत संस्कृतप्रमाणे पाली हा वैकल्पिक विषय म्हणून उपलब्ध करून द्यावा, यूपीएससी आणि एमपीएससीमध्ये पाली भाषेचा समावेश करावा, संविधानाच्या आठव्या अनुसूचीत पाली भाषेचा समावेश करावा, तसेच बौद्ध लेणी व विहारांना धार्मिक आणि शैक्षणिक प्रशिक्षण केंद्र म्हणून विकसित करावे, अशी मागणीही करण्यात आली. याशिवाय प्राचीन लेणी व संग्रहालयांचे विद्रूपीकरण थांबविणे, प्रशिक्षित लेणी मार्गदर्शक नियुक्त करणे, पर्यटकांसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे व प्रसाधनगृहांची सुविधा उपलब्ध करून देणे, लेणी परिसरात प्रथमोपचार पेटी व स्ट्रेचरची व्यवस्था करणे, तसेच युवा पिढीने धम्म चळवळीची जबाबदारी स्वीकारावी, यांसह एकूण १४ ठराव संमेलनात करण्यात आले.
या ऐतिहासिक संमेलनाला रत्नागिरी जिल्ह्यातून प्रा. दिलीप वासनिक, विजय य. जाधव, अनामिका जाधव, विजय कांबळे, विजय गो. जाधव, दीपिका वासनिक, तानाजी कांबळे, आदेश जाधव, शुभांगी कांबळे आणि सुवेश चव्हाण सहभागी झाले होते. देश-विदेशातील पालीभाषा, धम्मलिपी व लेणी अभ्यासकांचीही संमेलनाला उपस्थिती होती. संयोजक-निमंत्रक सुनील खरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी संमेलनाचे नियोजन आणि व्यवस्था केली.

