(रत्नागिरी)
‘कोण भाई झाले आहेत, मला बघायचे आहेत,’ अशी धमकी देत धारदार कुकरी घेऊन एकाला धमकी दिल्याचा प्रकार नाणीज तळवाडी (ता. रत्नागिरी) येथे रविवारी मध्यरात्री घडला. याप्रकरणी दोघांवर रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकाराबाबत निखिल नारायण सावंत (रा. नाणीज, रत्नागिरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित आरोपी म्हणून चिराग शरद खटकुळ (रा. नाणीज, रत्नागिरी) आणि अक्षय सुरेंद्र शिंदे (रा. सोमेश्वर, रत्नागिरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार नाणीज तळवाडी येथे रविवारी मध्यरात्री घडला. चिराग व अक्षय हे दोघे रविवारी रात्री ११:३० वाजण्याच्या दरम्यान गाडी (एमएच ४३, बीके ६२१०) घेऊन निखिल सावंत यांच्या घरासमोर आले.
यावेळी चिराग याने धारदार कुकरी काढून निखिल सावंत यांना दाखवून धमकावून शिवीगाळ केली. त्यानंतर निखिल सावंत यांचे चुलत भाऊ मनोज सावंत यांच्या अंगावरही चिराग याने गाडी घालण्याचा प्रयत्न केला. या प्रकारानंतर निखिल सावंत, त्यांचा भाऊ व गावातील काही प्रतिष्ठित व्यक्ती चिराग खटकूळ याच्या घरी गेले. यावेळी सर्वांमध्ये झटापट झाली. या झटापटीत आपल्याला मारहाण करून शिवीगाळ करण्यात आली, तसेच धमकीही देण्यात आली, असे निखिल सावंत यांनी आपल्या फिर्यादीमध्ये नमूद केले आहे.
या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून चिराग खटकूळ आणि अक्षय शिंदे या दोघांविरुद्ध जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलिस करत आहेत.