(रत्नागिरी / वैभव पवार)
रत्नागिरी येथील त्रिरत्न बौद्ध महासंघातर्फे अनागरिक धम्मपाल यांचा १६१ वा जयंती दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात बुधवार दिनांक १७ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सत्रात साजरा करण्यात आला. रत्नागिरी येथील विपश्यना ध्यान केंद्र एकदंतनगर गयाळवाडी येथे या कार्यक्रमाचे आयोजन १७ रोजी सायंकाळच्या सत्रात त्रिरत्न बौद्ध महासंघ रत्नागिरीच्या वतीने करण्यात आले होते. १७ सप्टेंबर हा अनागारिक धम्मपालांचा जन्मदिवस जगभर साजरा करण्यात येतो. या जयंतीनिमित्त त्रिरत्न बौद्ध महासंघ, रत्नागिरी यांच्या विद्यमाने विशेष प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते.
अनागारिक धम्मपाल यांनी १८९१ साली भारतात येऊन बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्तीसाठी न्यायिक व सामाजिक संघर्ष सुरू केला. हा संघर्ष आज १३३ वर्षांनंतरही सुरू असून महाविहार अद्याप बौद्धांच्या संपूर्ण ताब्यात नाही, ही ऐतिहासिक शोकांतिका आहे. धम्मपालांनी आपल्या आयुष्याची ४४ वर्षे या लढ्यात खर्च केली. त्यांनी पाली भाषेच्या प्रसारासाठी भारतभर भ्रमंती केली, शाळा–महाविद्यालये स्थापन केली, तसेच जागतिक स्तरावर बौद्ध धम्माचे प्रतिनिधित्व केले.
धम्मपालांचे योगदान हे बौद्ध अस्मिता, पालि भाषा आणि महाबोधी महाविहार मुक्तीसाठीचे अपार त्यागमय कार्य आहे. म्हणूनच त्यांचा जन्मदिवस जगभर साजरा केला जातो.
या निमित्ताने रत्नागिरी येथील त्रिरत्न बौद्ध महासंघाचे धम्ममित्र रविकांत पवार गुरुजी (निवृत्त शिक्षक, कवी व गायक) यांनी अनागरिक धम्मपाल यांचे जीवन व कार्य या विषयावर अत्यंत प्रभावी असे प्रवचन दिले. त्यांच्या प्रवचनातून अनागारिक धम्मपालांचे जीवनकार्य, त्याग, धम्मनिष्ठा आणि पालि भाषेचे महत्त्व यांचा सखोल उहापोह करण्यात आला.
या कार्यक्रमात धम्मदीप मंडळाचे अध्यक्ष जे. पी. जाधव त्याचप्रमाणे सचिव धम्ममित्र संतोष गमरे, प्रशांत जाधव, मंगेश जाधव. धम्मचारी सत्यरत्न धम्मचारी चंद्रनाथ आणि धम्ममित्र, धम्म सहाय्यक कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रवचनकारांची ओळख आभार धम्मचारी सुनंदक यांनी केले.
धम्मपालन गाथेने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

