(रत्नागिरी /प्रतिनिधी)
वाचनसंस्कृती जपण्याचा आणि अभिव्यक्तीला प्रभावी दिशा देण्याचा महत्त्वपूर्ण संदेश देणारी ज्येष्ठ रंगकर्मी तथा हबीब तन्वीर राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुहास भोळे यांची त्रिदिवसीय अभिवाचन कार्यशाळा नुकतीच उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. जिज्ञासा थिएटर्सच्या माध्यमातून गेली पाच दशके रंगभूमीची अविरत सेवा करणाऱ्या भोळे यांनी या कार्यशाळेतून अभिवाचनातील बारकावे प्रभावीपणे उलगडून दाखवले.
अ. के. देसाई हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. अंजली पिलणकर आणि जी. जी. पी. एस्.च्या माजी शिक्षिका सौ. सई साने यांच्या विशेष पुढाकारातून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटनप्रसंगी बोलताना सुहास भोळे म्हणाले, “आजच्या डिजिटल युगात वाचनसंस्कृती झपाट्याने लोप पावत असताना अशा कार्यशाळांच्या माध्यमातून सकारात्मक विचारांची पेरणी करता येते. प्रभावी अभिवाचनासाठी शब्दांवरील प्रभुत्व आणि भावनांची जाण तितकीच महत्त्वाची आहे.” कार्यशाळेदरम्यान अभिवाचनासाठी आवश्यक असणाऱ्या विविध अंगांचा सखोल अभ्यास सहभागींसमोर मांडण्यात आला. शब्दसामर्थ्य, उच्चारशास्त्र, आवाजाचे तंत्र, श्वसनाचे विविध प्रकार, तसेच ‘ओंकारा’चे शारीरिक व मानसिक आरोग्यावर होणारे परिणाम याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. मेंदू, मज्जासंस्था, शरीरातील ऑक्सिजनची पातळी, पेशींवरील कंपने आणि तणाव संप्रेरकांतील बदल यांबाबतही शास्त्रीय माहिती देण्यात आली.
वाचन आणि अभिवाचन यांतील मूलभूत फरक स्पष्ट करताना विविध भावभावना, नवरस, बोलीभाषा आणि शुद्ध भाषेतील उच्चारवैविध्य यांचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले. शब्दोच्चार करताना जिभ, ओठ, दात, कंठ यांसारख्या अवयवांचा योग्य वापर कसा करावा, याचे प्रशिक्षणही देण्यात आले. “केवळ आवाज चांगला असून उपयोग नाही; उच्चारांची स्पष्टता आणि भावनांची नेमकी अभिव्यक्ती यावरच अभिवाचनाचे यश अवलंबून असते,” असे भोळे यांनी सांगितले.
कार्यशाळेत सहभागी प्रत्येक शिबिरार्थीकडून स्वलिखित उतारे, नाट्य आणि कादंबरीतील निवडक भागांचे अभिवाचन करून घेण्यात आले. यामुळे सहभागींच्या आत्मविश्वासात लक्षणीय वाढ झाल्याचे आयोजकांनी नमूद केले. समारोपप्रसंगी मुख्याध्यापिका सौ. अंजली पिलणकर यांनी विद्यार्थ्यांसाठी अशा कार्यशाळांचे सातत्याने आयोजन करण्याचे आश्वासन दिले. कार्यशाळेअखेर सर्व सहभागी शिबिरार्थींना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

