( मुंबई )
अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात सुरू केलेल्या मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. राज्यातील कृत्रिम दूध तयार करून त्याचा पुरवठा करणाऱ्या संघटित रॅकेटवर FDA आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी संयुक्तपणे आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 13 आरोपींना अटक, 26 जणांविरुद्ध गुन्हे, ₹1.48 कोटींचा मुद्देमाल जप्त आणि 20 हजार लिटर संशयित दूध नष्ट करण्यात आले आहे.
ही संयुक्त कारवाई पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, जालना आणि ठाणे या पाच जिल्ह्यांमध्ये एकाचवेळी करण्यात आली. कारवाईदरम्यान 49 नमुने तपासणीसाठी जप्त करण्यात आले असून पाच अन्न व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तसेच चार आस्थापनांचा व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
महिनाभराच्या गुप्त तपासानंतर कारवाई
तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, कृत्रिम दूध तयार करून राज्यभर पुरवठा केला जात असल्याची विश्वासार्ह माहिती मिळाल्यानंतर FDA ने जवळपास महिनाभर गुप्त तपास केला. आरोपींना रंगेहात पकडण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहण्यात आली आणि त्यानंतर ही मोठी कारवाई करण्यात आली. मुंढे म्हणाले, “दुधासंदर्भातील ही आमची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. कृत्रिम दूध तयार करणारे मोठे रॅकेट उघडकीस आले असून तपास अजूनही सुरू आहे.”
डिटर्जंट, शॅम्पू आणि रसायनांपासून तयार होत होते बनावट दूध
तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी स्किम्ड मिल्क पावडर (SMP), व्हे/डेअरी परमीएट पावडर, इमल्सिफायर, डिटर्जंट, शॅम्पू आणि पामतेल यांचा वापर करून कृत्रिम दूध तयार करत असल्याचे उघड झाले. या रॅकेटचा मुख्य पुरवठा पुणे जिल्ह्यातील मंचर परिसरातून होत असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.
संपूर्ण पुरवठा साखळी उघड
FDA ने केवळ भेसळयुक्त दूध जप्त न करता संपूर्ण पुरवठा साखळीचा मागोवा घेतला. तपासात मुख्य पुरवठादार, मध्यस्थ, दूध संकलन केंद्रे, चिलिंग सेंटर्स, पॅकिंग युनिट्स आणि वितरकांचे जाळे उघडकीस आले. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार सुशांत बाबनराव हिंगे असल्याचे निष्पन्न झाले असून संदीप लोढा हा सल्लागार म्हणून कार्यरत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
13 आस्थापनांवर एकाचवेळी धाडी
4 आणि 5 जुलै 2026 रोजी सुमारे 30 अन्न सुरक्षा अधिकारी आणि 40 पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पथकांनी पाच जिल्ह्यांतील 13 ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले. या कारवाईत दूध संकलन केंद्रे, चिलिंग सेंटर्स, पॅकिंग युनिट्स आणि कृत्रिम दूध तयार करण्याची ठिकाणे तपासण्यात आली. यावेळी महत्त्वाची कागदपत्रे, व्यवहाराच्या नोंदी, उपकरणे आणि इलेक्ट्रॉनिक पुरावेही जप्त करण्यात आले.
13 आरोपी अटकेत, न्यायालयाकडून पोलीस कोठडी
या प्रकरणात भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 आणि अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, 2006 अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 26 आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून 13 आरोपींना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने आरोपींना 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मुंढे यांनी सांगितले की, मंचर येथून हे रॅकेट चालवले जात होते. प्राथमिक तपासात पुणे, सोलापूर, जालना, ठाणे, जळगाव आणि धाराशिव जिल्ह्यांपर्यंत या रॅकेटचे जाळे पसरल्याचे समोर आले आहे. काही किराणा दुकानदारांचाही या साखळीत सहभाग असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे.
आणखी दोन टोळ्यांचा शोध सुरू; मोक्काची शक्यता
तपासादरम्यान अशाच प्रकारे कृत्रिम दूध तयार करणाऱ्या आणखी दोन संघटित टोळ्यांची माहिती मिळाली असून त्यांच्याबाबत तपास सुरू आहे. आवश्यक पुरावे मिळाल्यानंतर संबंधित आरोपींवर कठोर कलमे लावली जातील. गरज भासल्यास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) लावण्याचाही विचार सुरू असल्याचे तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले.
नागरिकांना आवाहन
दूधासारख्या जीवनावश्यक अन्नपदार्थात भेसळ करणे हा समाजाच्या आरोग्याशी खेळ करणारा गंभीर गुन्हा असल्याचे सांगत तुकाराम मुंढे यांनी नागरिकांना आवाहन केले की, दूध किंवा इतर अन्नपदार्थांमध्ये भेसळीचा संशय आल्यास तातडीने अन्न व औषध प्रशासनाला माहिती द्यावी. राज्यभर अशाच समन्वित कारवाया भविष्यातही सुरू राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

