(नांदेड / वृत्तसंस्था)
नांदेड-भोकर मार्गावरील सीताखंडी घाटात गुरुवारी सायंकाळी ट्रक आणि प्रवासी टाटा मॅजिकची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत. जखमींवर भोकर आणि नांदेड येथे उपचार सुरू आहेत. अपघातातील काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
गुरुवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास टाटा मॅजिक (MH 26 AK 0548) नांदेडहून प्रवासी घेऊन भोकरच्या दिशेने जात होती. या वाहनातून १५ हून अधिक प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती आहे. भोकर शहरापासून काही अंतरावर असलेल्या सीताखंडी घाटाजवळ मॅजिक वाहनाची समोरून येणाऱ्या मालवाहू ट्रकशी जोरदार धडक झाली.
धडकेची तीव्रता एवढी होती की प्रवासी वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि ते रस्त्याच्या बाजूला फेकले गेले. अपघातानंतर काही प्रवासी वाहनातच अडकून पडले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. वाहनात अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून जखमींना तातडीने भोकरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सहा जणांचा जागीच मृत्यू
या भीषण अपघातात सय्यद अलमास (रा. बिलाल नगर, भोकर), शेख फिरोज (रा. भोकर), पांडुरंग लिंगू वाघमारे मिस्त्री आणि त्यांची पत्नी लक्ष्मीबाई पांडुरंग वाघमारे (रा. सय्यद नगर, भोकर), बलवान पवार (रा. पोटा तांडा, ता. हदगाव) आणि एका अनोळखी व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर अन्य दोघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
अपघातात ट्रकचालक बासुमिया शेख काजुलमिया (रा. कागजनगर, तेलंगणा), शेख खलील शेख वहीद, सोमनाथ मारुती येळगे (रा. जांभळज, ता. हदगाव) यांच्यासह इतर काही जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर भोकरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून, काही जखमींना पुढील उपचारांसाठी नांदेड येथे हलवण्यात आले आहे.
अपघाताची माहिती परिसरात पसरताच ग्रामीण रुग्णालयात नातेवाईक आणि नागरिकांची गर्दी झाली. ऐन पोळ्याच्या दिवशी ही दुर्दैवी दुर्घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


