( देवरूख / वार्ताहर )
संगमेश्वर (देवरूख) पंचायत समितीमध्ये लिपिक पदावर कार्यरत असलेले रोहित रजनीकांत राजापूरकर यांचे सोमवारी सायंकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या अकाली निधनामुळे देवरूख परिसरात तसेच मित्रपरिवारातून हळहळ व्यक्त होत आहे.
रोहित राजापूरकर हे संगमेश्वर पंचायत समितीमध्ये लिपिक म्हणून कार्यरत होते. शांत, सुस्वभावी आणि मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी मोठा मित्रपरिवार जोडला होता. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर आजारपणामुळे उपचार सुरू होते. मात्र, सोमवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या निधनाची बातमी देवरूखमध्ये समजताच मित्र, सहकारी आणि परिचितांना मोठा धक्का बसला. अनेकांना अश्रू अनावर झाले असून त्यांचा मित्रपरिवार शोकसागरात बुडाला आहे.
रोहित राजापूरकर यांची अंत्ययात्रा मंगळवारी सकाळी ९ वाजता त्यांच्या राहत्या घरातून निघणार आहे. त्यांच्या अकाली निधनाबद्दल मित्रपरिवारातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.


