(रत्नागिरी / वार्ताहर)
दिव्यांगत्वामुळे जीवन थांबत नाही, तर जिद्द, आत्मविश्वास आणि सकारात्मक विचारांच्या बळावर प्रतिकूल परिस्थितीवरही मात करता येते, हे नेवरे येथील ५६ वर्षीय मारुती गणपत ढेपसे यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. दोन्ही पायांची ताकद गमावल्यानंतरही त्यांनी परिस्थितीसमोर हार न मानता पुन्हा आपल्या व्यवसायाशी नाते जोडले. यंदाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीत गरुडाची वेशभूषा करून इलेक्ट्रिक तीनचाकीवरून उत्साहात सहभागी होत त्यांनी जिद्द आणि सकारात्मकतेचा संदेश दिला.
नेवरे, ता. जि. रत्नागिरी येथील रहिवासी असलेल्या मारुती ढेपसे यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. त्यांचे आई-वडील शेतीचे काम करीत होते. दहावीनंतर त्यांनी कोतवडे येथे स्वतःचे टू-व्हीलर रिपेअरिंग गॅरेज सुरू केले. कष्ट, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी व्यवसाय उभा केला आणि कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यास सुरुवात केली. सन १९९८ मध्ये त्यांचा विवाह झाला. त्यांना एक मुलगी असून ती विवाहित आहे, तर मुलगा शुभम ढेपसे सध्या गॅरेजचा व्यवसाय सांभाळत आहे.
गॅरेजमध्ये काम करताना जड वस्तू उचलल्यामुळे त्यांच्या उजव्या पायात कमजोरी जाणवू लागली. सन २००४ पासून त्यांच्या पायातील ताकद हळूहळू कमी होत गेली. अखेर सन २०१२ मध्ये लघवी करत असताना अचानक दोन्ही पायांतील पूर्ण ताकद गेली आणि पाय लुळे पडले. कमरेपासून खालच्या भागातील संवेदना कमी झाल्या तसंच नियंत्रणही गेले. चालता येणे पूर्णपणे बंद झाल्याने त्यांना बेडवरच राहावे लागले. दैनंदिन जीवनातील प्रत्येक कामासाठी त्यांना पत्नीवर अवलंबून राहावे लागत होते.
त्यानंतर त्यांनी मिरज येथे फिजिओथेरपीचे उपचार घेतले; मात्र अपेक्षित सुधारणा झाली नाही. सन २०१५ मध्ये आर एच पी फाउंडेशन, रत्नागिरीचे अध्यक्ष सादिक नाकाडे यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. ढेपसे यांची परिस्थिती जाणून घेतल्यानंतर फाउंडेशनतर्फे त्यांना व्हीलचेअर देण्यात आली. तसेच मुंबई येथील हाजी अली हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
पत्नीला सोबत घेऊन मारुती ढेपसे सुमारे पाच महिने मुंबईतील हाजी अली येथे उपचारासाठी राहिले. तेथे हॉस्पिटलकडूनही त्यांना व्हीलचेअर मिळाली. व्हीलचेअरच्या साहाय्याने ते बाहेर पडू लागले आणि इतरांशी संवाद साधू लागले. त्यामुळे त्यांच्या मानसिक स्थितीतही सकारात्मक बदल झाला.
हाजी अली येथे उपचार घेत असताना त्यांनी बेडवरून व्हीलचेअरवर, तसेच व्हीलचेअरवरून कमोडवर स्वतः शिफ्ट होणे, स्वतः अंघोळ करणे आणि दैनंदिन कामे स्वतः करण्याचे कौशल्य आत्मसात केले. त्यामुळे त्यांच्यात स्वावलंबनाचा आत्मविश्वास निर्माण झाला. याच काळात त्यांना बेडसोरची समस्याही निर्माण झाली. त्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. पाच महिन्यांच्या उपचारानंतर ते पुन्हा घरी परतले.
घरी आल्यानंतर हळूहळू व्हीलचेअरच्या साहाय्याने ते गॅरेजमध्ये जाऊन बसू लागले. मुलगा शुभम गॅरेजचा व्यवसाय पाहू लागला, तर मारुती त्याच्या कामावर लक्ष ठेवू लागले. परिस्थितीशी जुळवून घेत त्यांनी पुन्हा आपल्या व्यवसायाशी नाते जोडले. फेब्रुवारी २०२६ मध्ये त्यांच्यावर पुन्हा एक शस्त्रक्रिया करण्यात आली.
या सर्व प्रतिकूल परिस्थितीतही मारुती ढेपसे यांनी सकारात्मक दृष्टिकोन कायम ठेवला. यंदाच्या गणपती उत्सवात त्यांनी गरुडाची वेशभूषा करून आपल्या इलेक्ट्रिक तीनचाकीवरून गणपती विसर्जन मिरवणुकीत उत्साहाने सहभाग घेतला. त्यांच्या या कल्पक आणि उत्साही सहभागामुळे मिरवणुकीत वेगळीच ऊर्जा निर्माण झाली.
दिव्यांगत्वाचा बाऊ न करता त्यातून इतरांना प्रेरणा देण्याचा त्यांचा हा प्रयत्न लक्षवेधी ठरला. पारंपरिक गणपती उत्सवात त्यांनी आपल्या सहभागातून वेगळेच वलय निर्माण केले. अडचणी कितीही असल्या तरी मनात जिद्द आणि जगण्याची उमेद असेल, तर जीवनातील आनंदाचे क्षण स्वतःच्या पद्धतीने अनुभवता येतात, हा संदेश मारुती ढेपसे यांच्या कृतीतून मिळतो.



