(रत्नागिरी / वैभव पवार)
कोकणातील महिलांच्या कौशल्याला बाजारपेठ मिळवून देण्याबरोबरच त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या रत्नागिरीच्या जॅकप्रो महिला फार्मर प्रोड्युसर कंपनीने यंदा दिवाळीनिमित्त नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला आहे. कंपनीने तयार केलेल्या दिवाळी फराळ किटला चांगला प्रतिसाद मिळाला असून, या फराळाची मागणी मुंबई, पुण्यासह थेट पश्चिम बंगालमधूनही झाली आहे. त्यामुळे रत्नागिरीच्या महिला बचत गटांच्या हातगुणांना राज्याबाहेरही बाजारपेठ मिळाली आहे.
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी तालुक्यात १० हजार शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रकल्पांतर्गत जॅकप्रो महिला फार्मर प्रोड्युसर कंपनीची स्थापना झाली आहे. पंतप्रधानांच्या १० हजार शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही रत्नागिरी तालुक्यातील एकमेव कंपनी आहे. शेतकरी कुटुंबातील सुमारे साडेसातशे महिला या कंपनीच्या सभासद आहेत. शेतकरी महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला योग्य दर आणि दर्जा मिळवून देणे, तसेच त्यांच्या उत्पादनांसाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा कंपनीचा प्रमुख उद्देश आहे.
कोकणात आंबा, काजू, फणस, कोकम, करवंद, जांभूळ यांसारख्या फळांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. मात्र, ही उत्पादने प्रामुख्याने ठराविक हंगामातच उपलब्ध होतात. जानेवारी ते मे या कालावधीत जॅकप्रो कंपनीकडून या फळांची विक्री तसेच त्यांच्यापासून तयार केलेल्या उपपदार्थांची विक्री केली जाते. वर्षभर ग्राहकांना ही उत्पादने उपलब्ध व्हावीत, यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेजवळील संकेश्वर पार्क, शॉप क्रमांक ८ येथे महिला किसान मार्ट या नावाने कंपनीचे विक्री केंद्र सुरू आहे.
फळांचा हंगाम संपल्यानंतर सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत महिलांना रोजगार मिळावा, या उद्देशाने कंपनीने गणेशोत्सव आणि दिवाळी या कोकणातील प्रमुख सणांसाठी विशेष उत्पादनांची निर्मिती करण्याचे नियोजन केले. त्यानुसार कंपनीच्या अध्यक्षा सौ. स्वरा वैभव देसाई, सेक्रेटरी हेमलता केशव गिडये, संचालिका शरयू संदीप देसाई, ज्योती मोरे, समृद्धी सोनार, भक्ती मोरे, रवीना कदम, निशिगंधा कोसुम्बकर, कंपनीचे सीईओ सार्थक अजित कदम आणि अकाउंटंट सायली चंद्रकांत पवार यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या संकल्पनेतून दिवाळीनिमित्त ‘दिवाळी फराळ किट’ आणि ‘अभ्यंगस्नान दिवाळी सुगंधी किट’ हे दोन उपक्रम राबविण्यात आले.
या उपक्रमामुळे जवळपास ५० महिलांना रोजगाराची संधी मिळाली. फराळाचे पदार्थ तयार करण्यापासून ते पॅकेजिंग आणि विक्रीपर्यंतच्या कामांमध्ये महिलांनी सहभाग घेतला. यासाठी वेदा विवेक देसाई आणि अमिता अमित देसाई यांचेही सहकार्य लाभले. जॅकप्रो महिला फार्मर प्रोड्युसर कंपनी कोतवडे जिल्हा परिषद गटातील असून, ओरी आणि नेवरे येथील महिला सभासदांनी फराळाच्या पॅकिंगसाठी सहकार्य केले.
महिलांनी तयार केलेल्या फराळाची चव आणि गुणवत्ता उत्तम असल्याने मुंबई, पुणे यांसारख्या शहरांसोबतच थेट पश्चिम बंगालमध्येही फराळ पाठविणे शक्य झाले. या उपक्रमातून ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ मिळण्याबरोबरच स्थानिक महिलांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देता आला, अशी माहिती कंपनीच्या अध्यक्षा सौ. स्वरा देसाई आणि सेक्रेटरी हेमलता गिडये यांनी दिली.


