(नाणीजधाम / वार्ताहर)
राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी श्रीक्षेत्र नाणीजधाम येथील नाथांचे माहेर आश्रमात विराजमान झालेल्या गणरायाचे भक्तिभावाने दर्शन घेतले.
जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून श्रीक्षेत्र नाणीजधाम येथे गेल्या ३५ वर्षांहून अधिक काळ गणेशोत्सवाची समृद्ध परंपरा जपली जात आहे. यंदाही नाणीजधाम येथे पारंपरिक आणि भक्तिमय वातावरणात गणेशोत्सव साजरा केला जात आहे.
मंत्री डॉ. उदय सामंत यांचे नाथांचे माहेर आश्रमात आगमन झाल्यानंतर रामानंद संप्रदायाच्या दक्षिण पीठाचे उत्तराधिकारी परमपूज्य कानिफनाथ महाराज यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी डॉ. उदय सामंत यांनी परमपूज्य कानिफनाथ महाराज यांच्याशी संवाद साधत त्यांचे आशीर्वाद घेतले.
यानंतर डॉ. उदय सामंत यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह नाणीजधाम येथील गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी परिसरात भक्तिमय वातावरण झाले होते.


