(मुंबई / वृत्तसंस्था)
मुंबई आयआयटीतील २२ वर्षीय साहिल रवींद्र वाकोडे या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याप्रकरणी आयआयटीच्या एका प्राध्यापकाविरोधात ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला असून, चौकशीसाठी संबंधित प्राध्यापकांसह इतरांना बोलावले जाण्याची शक्यता असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी रविवारी दिली. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्याद्वारे केला जाणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
साहिल रवींद्र वाकोडे हा आयआयटी पवई परिसरातील वसतिगृह क्रमांक ४ मध्ये राहत होता. शुक्रवारी संध्याकाळी त्याने आपल्या खोलीत आत्महत्या केली. मिड-सेमिस्टर परीक्षेदरम्यान मोबाईल फोन वापरताना पकडले गेल्यानंतर काही तासांतच त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. साहिल हा यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी असून, तो ‘एनर्जी सायन्स अँड इंजिनिअरिंग’ विभागातील बी.टेकच्या द्वितीय वर्षात शिकत होता.
साहिलच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पवई पोलिसांनी शनिवारी ‘भारतीय न्याय संहिता’ (BNS) कलम १०८ अर्थात आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि ‘अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या’अंतर्गत गुन्हा दाखल केला. आत्महत्येपूर्वी साहिलला छळ आणि जातीवर आधारित भेदभावाला सामोरे जावे लागले, असा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. या आरोपांनंतर कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांनी निदर्शने केली. साहिलवर मोठ्या प्रमाणात दबाव होता आणि त्याला शैक्षणिक निलंबनाच्या धमक्या दिल्या जात होत्या, असा दावा आंदोलक विद्यार्थ्यांनी केला. त्यानंतर शनिवारी रात्री या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला.
दरम्यान, साहिलवर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली नव्हती, असे आयआयटी बॉम्बेने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. निवेदनानुसार, परीक्षेदरम्यान उत्तरं मिळवण्यासाठी साहिलने कथित परीक्षेची प्रश्नपत्रिका ‘चॅटजीपीटी’वर अपलोड केली होती. या प्रकरणावर संबंधित प्राध्यापक आणि विभागप्रमुखांनी साहिलसोबत चर्चा केली. त्याचे समुपदेशन करण्यात आले तसेच या घटनेचा त्याच्या शैक्षणिक कारकिर्दीवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही, अशी ग्वाही त्याला देण्यात आली. त्यानंतर साहिल आपल्या वसतिगृहातील खोलीत परतला आणि त्यानंतर संध्याकाळी तो मृत अवस्थेत आढळला, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
गेल्या सात महिन्यांत आयआयटी बॉम्बे कॅम्पसमध्ये आत्महत्येची ही तिसरी घटना आहे. फेब्रुवारीमध्ये वसतिगृहात द्वितीय वर्षाच्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. त्यानंतर जुलैमध्ये नवीन सत्राच्या सुरुवातीला बी.टेकच्या दुसऱ्या वर्षातील २० वर्षीय विद्यार्थ्यानेही आत्महत्या केली. आता साहिल रवींद्र वाकोडे याच्या आत्महत्येच्या घटनेने आयआयटी बॉम्बे कॅम्पसमध्ये खळबळ उडाली आहे.


