(कोटा)
भारतातील इस्रो (ISRO) आणि अमेरिकेतील नासा (NASA) यांच्या संयुक्त प्रयत्नातून विकसित करण्यात आलेला ‘निसार’ (NISAR) उपग्रह उद्या ७ नोव्हेंबर रोजी अधिकृतरीत्या कार्यान्वित होणार आहे. या ऐतिहासिक मोहिमेचे प्रक्षेपण ३० जुलै रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून करण्यात आले होते. निसार हा जगातील पहिला दुहेरी-फ्रिक्वेन्सी रडार इमेजिंग उपग्रह आहे, जो पृथ्वीवरील बदलांचे अचूक निरीक्षण करणार आहे. हा उपग्रह कार्यान्वित झाल्यानंतर शास्त्रज्ञांना भूकंप, ज्वालामुखी, भूस्खलन, हिमवर्षाव, जंगलातील बदल, शेती आणि हवामानातील परिवर्तन यांचा सखोल अभ्यास करता येईल. निसार दर १२ दिवसांनी संपूर्ण पृथ्वीची उच्च-गुणवत्तेची छायाचित्रे घेईल, ज्यातून पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सूक्ष्म बदलही टिपले जातील.
२४०० किलोग्रॅम वजनाचा हा उपग्रह इस्रोच्या I-13K संरचनेवर आधारित आहे. यामध्ये १२ मीटर व्यासाचा विशाल अँटेना असून तो ९ मीटर लांबीच्या बूमद्वारे अवकाशात उघडला जाईल. निसारमध्ये दोन अत्याधुनिक रडार तंत्रज्ञानाचा समावेश आहे — एल-बँड रडार (NASA कडून) आणि एस-बँड रडार (ISRO कडून). हे दोन्ही रडार एकत्रितपणे २४० किलोमीटर रुंदीपर्यंतच्या क्षेत्रातील अत्यंत स्पष्ट आणि तपशीलवार प्रतिमा कॅप्चर करू शकतात. उपग्रहाचे कार्यकाळ ५ वर्षांचा असून त्याचा सर्व डेटा मोफत आणि सर्वांसाठी खुला ठेवण्यात आला आहे.
निसार पृथ्वीभोवती फिरत राहील आणि दर १२ दिवसांनी संपूर्ण पृथ्वी, हिमनद्या आणि जंगले यांचे विश्लेषण करेल. मिळालेल्या माहितीवरून हवामान बदल, कार्बन नियमन आणि पर्यावरणातील घडामोडींवर सखोल अभ्यास करता येईल. जंगले आणि पाणथळ जागा वातावरणातील हरितगृह वायूंचे नियमन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात, त्यामुळे निसारकडून मिळणारा डेटा हवामान बदलाशी लढा देण्यासाठी उपयुक्त ठरेल.
याशिवाय, हा उपग्रह चक्रीवादळे, वादळे, भूकंप, ज्वालामुखी उद्रेक, हिमनद्यांचे वितळणे, समुद्राची वाढती पातळी, जंगलातील आगी, शेतीतील बदल, बर्फाचे प्रमाण कमी होणे अशा अनेक नैसर्गिक घटकांबाबत आगाऊ माहिती देईल. तसेच अवकाशातील धोकादायक कचरा आणि पृथ्वीभोवती फिरणाऱ्या अवशेषांची माहिती देऊन अवकाश सुरक्षेतही महत्त्वाची भूमिका बजावेल. निसार पृथ्वीवरील प्रकाशातील घट–वाढ, समुद्राच्या प्रवाहातील बदल आणि पर्यावरणीय संतुलनाच्या निरीक्षणासाठीही उपयुक्त ठरणार आहे.
ही मोहीम केवळ भारत आणि अमेरिकेपुरती मर्यादित नसून संपूर्ण जगासाठी एक वैज्ञानिक टप्पा ठरणार आहे. पृथ्वीवरील बदलांचे अचूक निरीक्षण आणि हवामान संकटाशी लढा देण्यासाठी निसार उपग्रह मोठा हातभार लावेल, असा विश्वास इस्रो आणि नासा दोन्ही संस्थांनी व्यक्त केला आहे.

