(पुणे)
पुण्यातील एका नामांकित खासगी रुग्णालयात झालेल्या किडनी प्रत्यारोपण प्रकरणात धक्कादायक घोटाळा उघडकीस आला असून, किडनी देणारी महिला ही रुग्णाची पत्नी नसून बनावट पत्नी असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात अमित अण्णासाहेब साळुंखे हे किडनी स्वीकारणारे रुग्ण असून सारिका गंगाराम सुतार या किडनीदाता असल्याचे तपासात समोर आले आहे. किडनी देण्यासाठी ठरलेली रक्कम न मिळाल्याने सारिका सुतार यांची बहीण कविता कोळी यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले, असे चौकशी अहवालात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या समितीने रुबी हॉल क्लिनिक, प्रत्यारोपण करणारे डॉक्टर, कागदपत्रे तयार करणारे कर्मचारी व एजंट, किडनीदाता, किडनी स्वीकारणारा रुग्ण, स्टेट ऑथरायझेशन समिती, ससून रुग्णालय, पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा क्रमांक दोन तसेच अन्य संबंधित व्यक्तींची सखोल चौकशी केली असून या चौकशीअंती 470 पानांचा सविस्तर अहवाल सादर करण्यात आला आहे.
अहवालानुसार अमित साळुंखे यांनी सारिका सुतार यांना स्वतःची पत्नी म्हणून दाखवून कथित विवाहाचे बनावट पुरावे आणि खोट्या कागदपत्रांच्या आधारे ससून रुग्णालयाच्या प्रत्यारोपण समितीकडून परवानगी मिळवली होती आणि त्यानंतर रुबी हॉल क्लिनिकमध्ये किडनी प्रत्यारोपण करण्यात आले.
किडनी देण्यासाठी सुतार यांना 15 लाख रुपये देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते; मात्र ही रक्कम न मिळाल्याने तक्रार दाखल करण्यात आली आणि मानवी अवयव तस्करीचा संशयास्पद प्रकार उघड झाला. या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल आरोग्य विभागाकडे सादर करण्यात आला असून पुढील आठवड्यात आरोग्यमंत्री अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

