(गुहागर / सचिन कुळये)
गुहागर तालुक्यातील तवसाळ तांबडवाडी येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षिका श्रीमती माधवी मारुती पाटील यांची महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्यावतीने प्रदान करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या ‘आयडॉल शिक्षक पुरस्कार २०२६-२७’ साठी निवड झाली आहे. त्यांच्या या राज्यस्तरीय यशामुळे तवसाळ तांबडवाडी गावासह पडवे केंद्रातील शाळा आणि संपूर्ण गुहागर तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेले सातत्यपूर्ण परिश्रम, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी राबवलेले नाविन्यपूर्ण उपक्रम आणि प्रभावी अध्यापन पद्धती या कार्याची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही दर्जेदार शिक्षण मिळावे, त्यांच्या अंगभूत कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळावे आणि अध्ययन-अध्यापन प्रक्रिया अधिक आनंददायी, रंजक व प्रभावी व्हावी, यासाठी माधवी पाटील यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. विद्यार्थ्यांची केवळ शैक्षणिक प्रगतीच नव्हे, तर त्यांच्यातील आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि व्यक्तिमत्त्व विकासालाही त्यांनी प्राधान्य दिले आहे. त्यांच्या या शैक्षणिक योगदानामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण जडणघडणीला हातभार लागला आहे.
शिक्षक हा केवळ ज्ञानदान करणारा नसून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचा शिल्पकार असतो, या विचारातून त्यांनी आपले शैक्षणिक कार्य सुरू ठेवले आहे. त्यांच्या या कार्याची राज्यस्तरावर दखल घेतली जाणे ही तवसाळ तांबडवाडी येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळेसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती आणि शाळेचे मुख्याध्यापक श्री. अंकुर मोहिते यांनी माधवी पाटील यांचे अभिनंदन केले. शिक्षणप्रेमी श्री. सचिन कुळये यांनीही दूरध्वनीद्वारे त्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ग्रामस्थ, महिला मंडळ आणि मुंबई युवक मंडळाच्या वतीनेही त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
माधवी मारुती पाटील यांच्या या यशामुळे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा, तवसाळ तांबडवाडीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या या गौरवामुळे ग्रामीण भागातील शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांना नवी प्रेरणा मिळणार असून, शाळेने यशाची अशीच उत्तुंग भरारी घेत राहावी, अशा सदिच्छा विविध स्तरांतून व्यक्त होत आहेत.
श्रीमती माधवी मारुती पाटील यांचे या उल्लेखनीय यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!


