(नवी दिल्ली)
देशातील प्रसिद्ध सायकल उत्पादक कंपनी ॲटलसचे माजी अध्यक्ष सलील कपूर यांनी मंगळवारी (3 सप्टेंबर) आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास त्यांनी स्वत:वर गोळी झाडून घेतली. त्यानंतर ताबडतोब पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. याबाबतचा पुढील तपास सुरू आहे. सलील कपूर यांनी डॉ. एपीजे अब्दुल कलाम लेन येथील त्यांच्या निवासस्थानी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली, असे दिल्ली पोलिसांनी सांगितले. पोलीस पथकाला घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडली असून, त्यामध्ये काही लोकांवर छळ केल्याचा आरोप आहे.
माहितीनुसार, सलील कपूर 70 वर्षांचे होते. त्यांच्या घरात एक छोटे मंदिर बांधले होते. याच मंदिरात बसून त्यांनी आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने स्वत:वर गोळी झाडून घेतली. सलील कपूर आर्थिक संकटातून जात होते आणि त्यांनी लोकांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे घेतले होते. त्यांच्यावर खूप कर्ज होते. त्यांचा पत्नीपासून घटस्फोट झाला असून मुलेही वेगळी राहतात. याआधी 2015 मध्ये सलील कपूर यांना 9 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या दोन प्रकरणांमध्ये दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने उत्तराखंडमधून अटक केली होती.