( मुंबई )
महाराष्ट्रातील सागरी वाहतूक अधिक आधुनिक, पर्यावरणपूरक आणि आत्मनिर्भर करण्याच्या दिशेने राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी अत्याधुनिक जलयाने (Water Metro Vessels) उपलब्ध करून देणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात इलेक्ट्रिक बोट निर्मिती सुविधा उभारणे यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळ आणि मे. झोया मरीन सर्व्हिसेस प्रा. लि. यांच्यात गुरुवारी (९ जुलै) मंत्रालयात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला.
मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत हा करार झाला. यावेळी त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सागरी क्षेत्रात मोठ्या गुंतवणुकीला प्रोत्साहन दिले जात आहे. मुंबई वॉटर मेट्रोसाठी आधुनिक आणि पर्यावरणपूरक जलयाने उपलब्ध होणार असून, सिंधुदुर्गमध्ये इलेक्ट्रिक बोट निर्मिती उद्योग उभारल्याने राज्याच्या सागरी अर्थव्यवस्थेला नवे बळ मिळणार आहे.
सिंधुदुर्गात 150 कोटींची गुंतवणूक
या सामंजस्य करारानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील तालवणे येथे सुमारे २२ एकर जागेवर १५० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीत अत्याधुनिक इलेक्ट्रिक बोट निर्मिती कारखाना उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे हरित सागरी वाहतुकीला चालना मिळण्याबरोबरच जहाजबांधणी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढणार आहे.
स्थानिक युवकांना रोजगाराची संधी
मंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, या प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग आणि कोकणातील स्थानिक युवकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. तसेच जहाजबांधणी उद्योगाला गती मिळून महाराष्ट्र सागरी क्षेत्रात आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करेल.
सागरी उद्योगवृद्धीसाठी महत्त्वाचा टप्पा
बैठकीत मुंबई वॉटर मेट्रो आणि इलेक्ट्रिक बोट निर्मिती प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा आराखडा, गुंतवणूक, तांत्रिक सहकार्य, स्थानिक कौशल्य विकास, रोजगारनिर्मिती आणि भविष्यातील सागरी उद्योगवृद्धी या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्यातील सागरी पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावणे, किनारपट्टी भागातील औद्योगिक विकासाला गती देणे आणि पर्यावरणपूरक जलवाहतूक व्यवस्था विकसित करणे या दृष्टीने हा सामंजस्य करार महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
या बैठकीला परिवहन व बंदरे विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय सेठी, महाराष्ट्र सागरी मंडळाचे वरिष्ठ अधिकारी, झोया मरीन सर्व्हिसेस प्रा. लि.चे संचालक जॉन फर्नांडिस, सुरज देवाढीया, अंबर आयंदे आणि डॉ. निलेश बानवलीकर उपस्थित होते.

