(अलिबाग)
नवी मुंबईतील उलवे आणि सानपाडा येथून फिरायला आलेल्या चार तरुणांपैकी दोन तरुण अलिबाग समुद्रात बुडून बेपत्ता झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सायंकाळी घडली. तन्मय मणियार आणि आदर्श अभी या दोघांचा थोडक्यात जीव वाचला असला, तरी शशांक सिंग (19) आणि पलाश पखर (19) या दोघांचा अद्यापही शोध लागलेला नव्हता.
मिळालेल्या माहितीनुसार, हे चारही मित्र शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अलिबाग समुद्रकिनारी फिरण्यासाठी आले होते. चौपाटीवर फेरफटका मारल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी बंगल्याच्या मागील बाजूस असलेल्या समुद्रात स्नानासाठी प्रवेश केला. मात्र, अचानक आलेल्या भरतीच्या तीव्र लाटा आणि पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते अडचणीत सापडले.
या वेळी शशांक सिंग आणि पलाश पखर खोल पाण्यात वाहून गेले, तर तन्मय मणियार आणि आदर्श अभी यांनी कसाबसा किनाऱ्यावर पोहोचत जीव वाचवला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच अलिबाग पोलिस, महसूल विभाग, आपत्ती व्यवस्थापन दल आणि किनारी सुरक्षा पथक घटनास्थळी दाखल झाले. रात्रीच शोधमोहीम सुरू करण्यात आली, परंतु अंधार आणि प्रचंड भरतीमुळे ती थांबवावी लागली होती. रविवारी सकाळपासून पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले, मात्र अद्यापही बेपत्ता दोघांचा अद्यापही शोध लागलेला नव्हता.
अलिबाग पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, समुद्रकिनाऱ्यावर कोणताही अज्ञात मृतदेह किंवा कपडे आढळल्यास तात्काळ अलिबाग पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. तसेच पर्यटकांनी समुद्रात पोहण्यापूर्वी हवामान, भरती-ओहोटीची माहिती घेऊनच सावधगिरी बाळगावी, असेही प्रशासनाने सांगितले आहे.

