(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
शेतात काम करत असताना सर्पदंश झाल्याने गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या ६० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अनिता अनंत उभारे (वय ६०, रा. धोपटवाडी, गोळप, ता. जि. रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिता उभारे या १५ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास गोळप येथील शेतात काम करीत होत्या. त्यावेळी त्यांना साप चावला. सर्पदंशानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रत्नागिरी येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी १९ ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथील सी.पी.आर. रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते.
दरम्यान, उपचार सुरू असतानाच त्यांची प्रकृती खालावली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. या घटनेची प्राथमिक नोंद राजारामपुरी पोलिस ठाणे, कोल्हापूर येथे करण्यात आली होती. त्यानंतर संबंधित नोंद पूर्ण करून पूर्णगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील कार्यवाही पूर्णगड पोलिसांकडून करण्यात येत आहे.


