(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीतील प्रभाग क्रमांक 10 मधील मतदान प्रक्रिया अपिलाच्या निकालांमध्ये झालेल्या विलंबामुळे राज्य निवडणूक आयोगाने स्थगित केली असून ही निवडणूक आता 2 डिसेंबरऐवजी 20 डिसेंबर रोजी होणार आहे. सुधारित कार्यक्रम आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी जाहीर केला आहे.
प्रभाग 10 मध्ये अपक्ष उमेदवार सचिन शिंदे आणि संपदा रसाळ-राणा यांच्या प्रतिज्ञापत्रातील रचना आयोगाच्या नमुन्याशी सुसंगत नसल्याचे नमूद करून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचे अर्ज अवैध ठरवले होते. या निर्णयाविरोधात दोन्ही उमेदवारांनी जिल्हा न्यायालयात अपिल दाखल केले होते; मात्र 24 नोव्हेंबर रोजी न्यायालायाने हे अपिल फेटाळले. या निकालामुळे 4 नोव्हेंबरला जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार प्रभाग 10 मधील मतदान घेऊ नये, असे निर्देश आयोगाने दिले.
प्रभाग 10 वगळता इतर सर्व प्रभागांमध्ये मतदान पूर्वनिश्चित वेळापत्रकानुसारच पार पडणार आहे. नव्या कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 10 डिसेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत असेल, तर अंतिम उमेदवारांची यादी 11 डिसेंबरला जाहीर होईल. 20 डिसेंबरला सकाळी 7.30 ते 5.30 या वेळेत मतदान होईल आणि मतमोजणी 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल. प्रभाग 10 साठी 4 डिसेंबरपासून आचारसंहिता लागू होणार असल्याची माहिती आयोगाने दिली असून, संपूर्ण प्रक्रिया निवडणुकीची पारदर्शकता अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे.

