(दापोली / वार्ताहर)
तालुक्यातील टाळसुरे शेलारवाडी क्रमांक २ येथे बंद घराला लक्ष्य करत अज्ञात चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला. ३ नोव्हेंबर रोजी सकाळी सव्वानऊ ते दुपारी पावणेएकच्या दरम्यान घडलेल्या या चोरीत लोखंडी कपाटातील सुमारे ३ लाख ९७ हजार रुपये किमतीचे दागिने चोरीला गेले. दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दापोली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील तक्रारदार किरण किसन चोगले हे कामानिमित्त खेड येथे गेले होते. त्यांची आई घराजवळील परिसरात साफसफाईचे काम करीत होती. याच दरम्यान अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून लोखंडी कपाटाचे लॉकर उघडले. विशेष म्हणजे, कपाटाजवळच ठेवलेल्या मूळ चावीचा वापर करून लॉकर उघडण्यात आले आणि त्यातील सोन्याचे दागिने घेऊन चोरट्याने पोबारा केला.
चोरीस गेलेल्या ऐवजात १० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, २५ ग्रॅम व ४ ग्रॅम वजनाची दोन मंगळसूत्रे, अंगठी, झुमके, कर्णफुले, बाळी आणि कानातील रिंग यांचा समावेश आहे. या सर्व दागिन्यांची एकूण किंमत सुमारे ३ लाख ९७ हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
घरात परतल्यानंतर कपाटाची पाहणी करताना दागिने चोरीला गेल्याचे चोगले कुटुंबीयांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी दापोली पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घरफोडीचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजकुमार यादव करीत आहेत.


