(रत्नागिरी /प्रतिनिधी)
सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रातील जैवविविधता आणि वन्यजीवांच्या अधिवासाला गंभीर धोका निर्माण करणाऱ्या वणवा प्रकरणात मुख्य आरोपीला रत्नागिरी न्यायालयाने १६ मेपर्यंत तीन दिवसांची वनकोठडी सुनावली आहे. आंबा वनपरिक्षेत्रातील निवळे आणि गोठणे नियतक्षेत्रात लावण्यात आलेल्या भीषण वणव्याप्रकरणी वन विभागाने कठोर कारवाईची भूमिका घेतली असून या प्रकरणामुळे पर्यावरणीय सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी बापू बाजू चौगुले याच्याविरोधात यापूर्वीही एक गुन्हा दाखल होता. त्या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर गोठणे नियतक्षेत्रातील स्वतंत्र वणवा प्रकरणात आंबा वनपरिक्षेत्राच्या पथकाने त्याला पुन्हा ताब्यात घेत न्यायालयात हजर केले.
वन विभागाच्या माहितीनुसार, आरोपीवर वनसंपत्तीचे नुकसान करण्याबरोबरच शासकीय मालमत्तेची चोरी केल्याचे गंभीर आरोप आहेत. या घटनेमागील नेमका हेतू, तसेच या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास वनकोठडीदरम्यान करण्यात येणार आहे.सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तुषार चव्हाण आणि उपसंचालक स्नेहलता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत. आंबा वनक्षेत्र अधिकारी प्रदीप कोकितकर यांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती दिली.
व्याघ्र प्रकल्पातील संवेदनशील जंगल परिसरात लागलेल्या या वणव्यामुळे वन्यजीवांचा अधिवास, दुर्मीळ वनस्पती आणि नैसर्गिक साधनसंपत्तीला मोठा फटका बसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पर्यावरण आणि जैवविविधतेला धोका निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात कोणतीही गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा वन प्रशासनाने दिला आहे. या कारवाईत वनपाल आणि वनरक्षकांच्या पथकाने सक्रिय सहभाग घेतला असून पुढील तपास सुरू आहे.

