(राजापूर /रत्नागिरी)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगातील ह्युंदाई क्रेटाने पुढे जाणाऱ्या अशोक लेलँड ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याची घटना शुक्रवारी पहाटे वाटुळ ब्रिजवर घडली. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून, क्रेटाचालकाविरोधात राजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक रजनीनाथ सुर्वे (वय ४८, रा. ए/९०१, मानसरोवर नीलकांत, हाईट, पोखरण क्रमांक २, उपवन लेक, जि. ठाणे) हे ह्युंदाई क्रेटा (एमएच ०४ जीझेड ९०२९) घेऊन मुंबई-गोवा महामार्गावरून ठाणे ते मालवण असा प्रवास करत होते. १८ सप्टेंबर रोजी पहाटे सुमारे ४.४५ वाजण्याच्या सुमारास त्यांची गाडी राजापूर तालुक्यातील वाटुळ ब्रिजवर आली. यावेळी रस्त्याच्या परिस्थितीकडे योग्य ते लक्ष न देता क्रेटा भरधाव व निष्काळजीपणे चालविल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्याचवेळी पुढे मार्गस्थ असलेल्या अशोक लेलँड ट्रक (एमएच ०८ एच २७२०)च्या मागील बाजूस क्रेटाची जोरदार धडक झाली. या धडकेत ट्रकचे तसेच ह्युंदाई क्रेटाचे नुकसान झाले. अपघातास क्रेटाचालकाचा भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालविण्याचा प्रकार कारणीभूत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी फिर्यादी बापूराव महादेव काटे यांच्या तक्रारीवरून आरोपी अभिषेक सुर्वे यांच्याविरोधात गुन्हा क्रमांक २५०/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम २८१ तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


