(गुहागर / रत्नागिरी)
चिपळूण-गुहागर मार्गावरील खातू मसाले उद्योग समोरील वळणावर एसटी बसने रॉयल इनफिल्ड बुलेटला धडक दिल्याची घटना १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली. या अपघातात बुलेटस्वार चैतन्य अनंत जाखळे (३३, रा. असगोली खारवीवाडी, ता. गुहागर) हे जखमी झाले असून त्यांच्या मोटारसायकलचेही नुकसान झाले. याप्रकरणी एसटी बसचालक नामदेव शिवाजी पवार (४०) याच्याविरोधात गुहागर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चैतन्य जाखळे हे १३ सप्टेंबर रोजी शृंगारतळी येथे खरेदी करून रॉयल इनफिल्ड बुलेट (एमएच ०८ बीएफ २६९१) वरून चिपळूण-गुहागर मार्गाने गुहागरच्या दिशेने जात होते. सायंकाळी सुमारे ४.१० वाजता खातू मसाले उद्योग समोरील रस्त्यावरील वळणावर ते आले असता, समोरून एसटी बस येत होती. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, एसटी बसचालक नामदेव पवार हा समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात रस्त्याच्या उजव्या बाजूला आला. यावेळी बसच्या चालकाच्या बाजूकडील मागील भागाची बुलेटला धडक बसली. धडकेमुळे चैतन्य जाखळे यांना लहान-मोठ्या दुखापती झाल्या, तसेच त्यांच्या मोटारसायकलचे नुकसान झाले.
या घटनेप्रकरणी गुहागर पोलिस ठाण्यातील पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिकेत अविनाश चव्हाण यांनी फिर्याद दिली. त्यावरून नामदेव पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १८४ अन्वये गुन्हा नोंदवला असून, अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.


