(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदी ज्येष्ठ पत्रकार श्री. महेश शिवलकर यांची नियुक्ती झाली असून ही राजापूर शहरासाठी अभिमानास्पद बाब असल्याचे मजीद पन्हळेकर यांनी म्हटले आहे.
कोणताही राजकीय वारसा नसताना, सत्तेच्या मोहापासून दूर राहून मिळालेली ही संधी नागरिकांच्या अपेक्षांना दिलासा देणारी आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी १९८८-९० या काळात राजापूर न्यायालयात कामाची सुरुवात केली. त्यानंतर वृत्तपत्र क्षेत्रात पदार्पण करून आजपर्यंत सातत्यपूर्ण आणि विश्वासार्ह कामगिरी करत त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
सत्ताधारी असोत वा विरोधक, कोणताही पक्षभेद न ठेवता सभ्य आणि ठोस शब्दांत मांडलेले त्यांचे लेखन नेहमीच लक्षवेधी ठरले आहे. नगरपरिषदेतील त्रुटी, नागरी समस्या, पूरस्थिती, नदी गाळ उपसा, कोदवली पुनर्वसन, पाणीटंचाई, वाहतूक कोंडी, रिक्षा वाहतूक व रस्त्यांची अवस्था यासारख्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला. यामुळे पत्रकार म्हणून त्यांना काहीवेळा अडचणींना सामोरे जावे लागले, तरीही त्यांनी आपल्या भूमिकेशी कधीही तडजोड केली नाही, असे पन्हळेकर यांनी आवर्जून सांगितले.
यापूर्वी नगरपरिषदेच्या ब्रँड अॅम्बेसेडरपदी त्यांची निवड ही शहराशी असलेले दृढ नाते आणि नवनिर्माणाचा ध्यास याचीच पावती होती. वृत्तपत्र क्षेत्रात मोठ्या संपर्कात असूनही त्यांनी त्याचा वैयक्तिक स्वार्थासाठी कधी उपयोग केला नाही, ही बाब सर्वश्रुत आहे.
तालुका पत्रकार संघाच्या विविध उपक्रमांमध्ये आरोग्य शिबिरे, स्पर्धा, मार्गदर्शन शिबिरे आणि सामाजिक उपक्रम राबवताना त्यांचे योगदान मोलाचे राहिले. कमी बोलून काम करण्याची त्यांची शैली आणि पडद्यामागील सामाजिक कार्य सर्वमान्य आहे.
माजी लोकप्रतिनिधी, विविध राजकीय नेते आणि पत्रकारांशी त्यांचे संबंध सौहार्दपूर्ण असले, तरी परखड लेखन करताना त्यांनी कधीही हात आखडता घेतला नाही. हीच निर्भीड भूमिका आता नगरपरिषदेच्या सभागृहातही कायम राहील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
नागरिकांचा आवाज म्हणून महेश शिवलकर नगरपरिषदेच्या माध्यमातून प्रभावी काम करतील, असा विश्वास व्यक्त केला जात असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

