(लांजा / प्रतिनिधी)
बेताची आर्थिक परिस्थिती, झोपडपट्टीतलं घर, ना कुठली शिकवणी ना खास सुविधा; मात्र अपार जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर शिरवली (ता. लांजा) येथील सृष्टी सुरेश कुळ्ये हिने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत देशात ८३१ वा क्रमांक मिळवत कोकणासह राज्याचा मान उंचावला आहे.
सृष्टी कुळ्ये ही लांजा तालुक्यातील शिरवली पलीकडचीवाडी येथील मूळ रहिवासी असून सध्या ती मुंबईतील मानखुर्द शिवनेरी नगर झोपडपट्टीमध्ये वास्तव्यास आहे. तिचे वडील सुरेश कुळ्ये हे मुंबईत एका प्रिंटिंग प्रेसमध्ये मशीन ऑपरेटर म्हणून काम करतात, तर आई गृहिणी आहे. दोन भावंडांमध्ये ती सर्वात मोठी. घरची परिस्थिती तुटपुंजी, तरीही शिक्षणाची ओढ थांबली नाही.
सन २०२२ मध्ये तिने गोवंडी येथील एम. पॉवर लायब्ररीमध्ये प्रवेश घेतला आणि तिथेच अभ्यास सुरू ठेवला. कोणतेही खासगी क्लासेस न घेता, केवळ पुस्तकांवर आणि स्वअभ्यासावर भर देत, तिने यूपीएससीसारख्या कठीण परीक्षेत यश संपादन केलं. घरात शैक्षणिक वातावरण नसतानाही सृष्टीने यशाचा वटवृक्ष आपल्या जिद्दीच्या मातीवर उभा केला.
सृष्टीच्या या यशानंतर शिरवली युवक मंडळ आणि कुळ्ये परिवाराकडून तिचा विशेष सत्कार करण्यात आला. तिच्या आई-वडिलांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहताना दिसले. सृष्टीचा आत्मविश्वास आणि यश पाहून गावात आणि परिसरात प्रेरणेची लाट पसरली आहे.
“घरची परिस्थिती बघितली होती. आई-वडिलांचे कष्ट अनुभवले होते. म्हणून मनाशी ठरवलं होतं, चांगलं शिकायचं, मोठं व्हायचं. आई-वडील, शिक्षक आणि हितचिंतकांच्या प्रोत्साहनामुळे हे यश शक्य झालं,” असं भावनिक शब्दांत सृष्टीने आपल्या यशाचं श्रेय दिलं. सृष्टीचं यश सामान्य परिस्थितीतून असामान्य स्वप्नं पूर्ण करता येतात याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. तिची कहाणी अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी ठरणारी आहे.