(लांजा /प्रतिनिधी)
लांजा शहरातील वर्दळीच्या लांजा-साटवली मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात ठाण मांडून बसलेल्या अनधिकृत खोक्यांविरोधात अखेर नगरपंचायत प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला. मुख्याधिकारी अभिजीत कुंभार यांच्या उपस्थितीत सोमवारी दुपारी करण्यात आलेल्या कारवाईत नऊ अनधिकृत खोके हटविण्यात आले. त्यामुळे वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणाच्या विळख्यातून छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसराने अखेर मोकळा श्वास घेतला.
लांजा-साटवली मार्गावरील अनधिकृत खोक्यांमुळे वाहतुकीला वारंवार अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारी नगरपंचायतीकडे प्राप्त झाल्या होत्या. विशेषतः या मार्गावरील शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनीही अतिक्रमणामुळे निर्माण होणाऱ्या धोक्याकडे नगरपंचायतीचे लक्ष वेधले होते. त्यातच रस्त्यालगतच्या हातगाड्यांवर दुपारनंतर खवय्यांची गर्दी होत असल्याने वाहतुकीची कोंडी आणि अपघाताचा धोका वाढत होता. हा मार्ग नेहमीच वर्दळीचा असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला होता. अखेर नगरपंचायतीने कारवाईचा निर्णय घेतला.
अतिक्रमण हटविण्यात आलेल्या रस्त्यालगतच्या जागेवर यापूर्वी तब्बल १३ अनधिकृत खोके होते. त्यापैकी वापरात नसलेले चार खोके नगरपंचायतीने महिनाभरापूर्वीच हटविले होते. उर्वरित नऊ खोकेधारकांना जुलै महिन्यात नोटिसा बजावून अतिक्रमण काढण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, नोटिसीनंतरही खोके कायम राहिल्याने नगरपंचायतीने २५ ऑगस्ट रोजी पुन्हा नोटीस बजावून ४८ तासांची अंतिम मुदत दिली. या मुदतीत अनधिकृत खोके स्वतःहून हटविण्याचे निर्देश देण्यात आले होते. मुदत संपल्यानंतर सोमवारी नगरपंचायतीच्या पथकाने प्रत्यक्ष कारवाई सुरू केली. कारवाईदरम्यान सहा खोकेधारकांनी स्वतःहून खोके हटविले, तर उर्वरित तीन खोके नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी हटविले.
लांजा-साटवली मार्गावर सातत्याने वाढणारी वर्दळ आणि त्यातच रस्त्यालगत उभे असलेले खोके यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत होता. हातगाड्यांभोवती होणारी गर्दी आणि अनधिकृत खोक्यांमुळे रस्त्याची उपलब्ध जागा कमी होत होती. विशेषतः शाळेच्या परिसरातून विद्यार्थ्यांची ये-जा होत असल्याने वाहतूककोंडीबरोबरच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही गंभीर बनला होता. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत नगरपंचायतीने अखेर अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली.
चार तास धडक कारवाई
सोमवारी दुपारी १२ ते ४ या चार तासांच्या कालावधीत ही कारवाई करण्यात आली. नगरपंचायतीच्या पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने अनधिकृत बांधकामे आणि खोके हटविले. या कारवाईवेळी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिजीत कुंभार, प्रभारी नगर अभियंता रणवीर कोकरे-देसाई, नगररचना सहायक सुचेत बन्ने, लिपिक संजय गुरव, संतोष आगरे यांच्यासह नगरपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.
अतिक्रमणमुक्त जागा आता पुन्हा गजबजणार नाही ना?
कारवाईनंतर चौक परिसर मोकळा झाला असला तरी अतिक्रमण पुन्हा होऊ नये, यासाठी नगरपंचायतीला सातत्याने देखरेख ठेवावी लागणार आहे. अन्यथा कारवाईचा धडाका काही दिवसांतच इतिहासजमा होऊन पुन्हा त्याच जागी खोके आणि हातगाड्या उभ्या राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्ते नागरिकांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी आहेत; अनधिकृत खोक्यांसाठी नव्हेत. त्यामुळे केलेली कारवाई केवळ एकदाची मोहीम न ठरता, लांजा शहरातील अतिक्रमणाला कायमचा आळा घालणारी ठरेल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

