(पुणे / वृत्तसंस्था)
कात्रज-देहूरोड बायपासवरील नवले पुलाजवळ असलेल्या भूमकर पुलावर मध्यरात्री मालवाहू कंटेनरचा भीषण अपघात झाला. साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या कंटेनरचे अचानक ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कंटेनरने पुढील ट्रकसह रस्त्यावरील अन्य वाहनांना जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत कंटेनरमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अवजड कंटेनरचे भूमकर पुलावर अचानक नियंत्रण सुटले. ब्रेक निकामी झाल्यामुळे चालकाला कंटेनर नियंत्रित करता आला नाही. त्यानंतर भरधाव कंटेनरने समोरील ट्रकला धडक दिली आणि पुढे जाताना रस्त्यावरील इतर वाहनांनाही जोरदार धडक दिली.
कंटेनर आणि ट्रकची धडक एवढी भीषण होती की, दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघाताची तीव्रता इतकी भयानक होती की ट्रकचा पुढील भाग पूर्णपणे चेपला गेला आहे. या भीषण धडकेत एक व्यक्ती ट्रकच्या कॅबिनमध्येच आत अडकून पडली होती. त्याला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. वाहनांमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी गॅस कटरच्या सहाय्याने वाहनांचे पत्रे कापले.
या अपघातात मृत्यू झालेल्या दोघांचीही ओळख अद्याप पटलेली नाही. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलिस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या.
या दुर्घटनेमुळे मुंबई-बंगळूर महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. अपघातग्रस्त वाहने हटवून वाहतूक सुरळीत करण्याचे काम पोलिसांकडून करण्यात आले.


