(रत्नागिरी /प्रतिनिधी)
जिल्ह्यात अमली पदार्थांची विक्री, बेकायदेशीर साठवणूक, बाळगणे तसेच सेवन करणाऱ्यांविरोधात रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने ‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत धडक मोहीम राबवून कारवाईचा वेग वाढविला आहे. ८ ते १४ सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत अमली पदार्थ सेवनाचे १०, तर बेकायदेशीररीत्या अमली पदार्थ बाळगल्याचे सहा, असे एकूण १६ गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणांत २२ आरोपींना अटक करण्यात आली असून, एकूण २ लाख २ हजार २०० रुपये किमतीचा अमली पदार्थसाठा जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात अमली पदार्थांची विक्री करणारे, त्यांचा बेकायदेशीर ताबा ठेवणारे तसेच सेवन करणाऱ्यांवर लक्ष केंद्रित करून कारवाई करण्यात आली. या कारवाईत ७७ हजार रुपये किमतीचे ५.१५ ग्रॅम ब्राऊन हेरॉईन, तसेच १ लाख २५ हजार २०० रुपये किमतीचा २.५११ किलो गांजा जप्त करण्यात आला. अशा प्रकारे एकूण २ लाख २ हजार २०० रुपये किमतीचा अमली पदार्थसाठा पोलिसांच्या हाती लागला. अमली पदार्थांची अवैध विक्री आणि सेवनाचा विळखा रोखण्यासाठी केवळ कारवाईपुरते मर्यादित न राहता प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि जनजागृतीपर उपक्रमांवरही भर देण्यात येत आहे. विशेषतः युवकांना अमली पदार्थांपासून दूर ठेवण्याच्या उद्देशाने ‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत.
जिल्ह्यात अमली पदार्थांची अवैध विक्री, वाहतूक, साठवणूक किंवा सेवनासंदर्भात कोणतीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी ती तातडीने जवळच्या पोलीस ठाण्यात कळवावी, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने केले आहे. तसेच ‘रत्नसेतू चॅटबॉट’ ९३७१४१५६१२ या क्रमांकावरही माहिती देता येणार आहे. अमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांना आळा घालण्यासाठी ‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत कारवाई सातत्याने सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


