(रत्नागिरी / प्रतिनिधी)
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत कार्यरत असलेल्या सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे दिनांक १० जुलै २०२५ रोजी ‘राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
१९५७ साली डॉ. हिरालाल चौधरी आणि डॉ. कोल्लीयील अलीकुन्ही यांनी भारतीय प्रमुख कार्प माशांच्या कृत्रिम प्रजोत्पादनात प्रथम यश मिळवले. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ भारत सरकारने २००१ पासून १० जुलै हा ‘राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन’ म्हणून घोषित केला आहे. यंदा या दिनाचे २५ वे वर्ष होते.
या औचित्याने ‘शोभिवंत मत्स्यपालन : इंद्रधनुष क्रांतीकडे वाटचाल’ या विषयावर विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. केतन चौधरी, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी आणि मुंबईतील ज्येष्ठ मत्स्य उद्योजक श्रीराम हातवलणे यांच्या हस्ते झाले. उद्घाटन प्रसंगी डॉ. हिरालाल चौधरी आणि डॉ. कोल्लीयील अलीकुन्ही यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
राज्यभरातील सहभाग
या चर्चासत्रात महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमधून आणि गोवा, कर्नाटकातील सुमारे ४० शोभिवंत मत्स्य व्यावसायिक सहभागी झाले. प्रमुख उपस्थितांमध्ये संस्थेचे अध्यक्ष फहद जमादार, श्रीराम हातवलणे, श्री. विस्पी मिस्त्री, डॉ. आसिफ पगारकर, डॉ. केतन चौधरी आदींचा समावेश होता.
डॉ. पगारकर यांनी प्रास्ताविकात मत्स्य क्षेत्रातील संशोधन व प्रशिक्षणात सागरी केंद्राच्या भूमिका अधोरेखित केली. यु.एन.डी.पी. प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक श्री. ऋषिकेश भाटकर यांनी कांदळवनातील मत्स्यशेती व त्यावरील योजनांवर सादरीकरण केले.
व्यावसायिकांचे मनोगत आणि सन्मान
चर्चासत्रात सहभागी व्यावसायिकांनी आपले अनुभव मांडले. अनेकांनी संशोधन केंद्रात घेतलेल्या प्रशिक्षणामुळे व्यवसायात सकारात्मक बदल झाल्याचे नमूद केले. श्रीराम हातवलणे यांनी शासनाने या व्यवसायासाठी अधिक सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली, तर श्री. विस्पी मिस्त्री यांनी असे मार्गदर्शन शिबिर दरवर्षी व्हावे अशी मागणी केली. शेवटच्या सत्रात उपस्थित सर्व सक्रीय व्यावसायिकांना त्यांच्या योगदानाबद्दल प्रशंसापत्र प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण करताना डॉ. केतन चौधरी यांनी “एकत्र येऊन काम केल्यास अडचणींवर मात करता येते,” असे सांगत ‘रत्नागिरी शोभिवंत मत्स्य व्यावसायिक संघटना’च्या कार्याचे अभिनंदन केले आणि भविष्यातही सहकार्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती अपूर्वा सावंत यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. सचिन साटम यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. मकरंद जोशी, संशोधन संचालक डॉ. प्रशांत शहारे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. डॉ. केतन चौधरी यांच्या नेतृत्वाखाली डॉ. आसिफ पगारकर, डॉ. हरिष धमगये, प्रा. नरेंद्र चोगले, प्रा. सचिन साटम, श्रीम. व्ही. आर. सदावर्ते, श्रीम. ए. एन. सावंत यांच्यासह केंद्रातील अनेक कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.