(पुणे / वृत्तसंस्था)
पत्नीला आपण मलेशियाची राजधानी क्वालालंपूरला बिझनेस ट्रिपसाठी जात असल्याचे सांगून प्रत्यक्षात मैत्रिणीसोबत सुट्ट्या एन्जॉय करण्याचा प्लॅन आखणे पुण्यातील एका ४६ वर्षीय बिझनेसमनला चांगलेच महागात पडले. १४ सप्टेंबरला तो मैत्रिणीसोबत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचला. मात्र, इमिग्रेशन अधिकाऱ्यांना मैत्रिणीचा जुना पासपोर्ट असल्याचे लक्षात येताच संपूर्ण प्रकार उघडकीस आला. जुना पासपोर्ट हरवल्याची तक्रार आधीच केलेला हाचा पासपोर्ट घेऊन ती प्रवास करत असल्याचे समोर आले.
विमानतळावर आपली मैत्रीण अडकल्याचे लक्षात येताच बिझनेसमनने तातडीने आपली ट्रिप रद्द केली. मात्र, विमानतळावर खोटे उघड झाल्याने पत्नीसमोर आपले बिंग फुटेल, या भीतीने त्याने आणखी एक कहाणी रचली. त्याने स्वतःच्या अपहरणाचा बनाव करण्याचा निर्णय घेतला.
सहार पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी तपास सुरू केल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. पुण्यात लॉन्ड्रीचा मोठा व्यवसाय करणाऱ्या या ४६ वर्षीय व्यक्तीने विमानतळावरील प्रकारानंतर स्वतःचा मोबाईल फोन बंद केला. त्यानंतर विमानतळावरील लँडलाइनवरून त्याने पत्नीला फोन केला. इमिग्रेशनच्या अडचणींमुळे आपल्याला मोबाईल जमा करावा लागत असल्याचे त्याने पत्नीला सांगितले. त्यानंतर तो गर्लफ्रेंडसोबत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला गेला.
दुसऱ्या दिवशीही त्याने पत्नीसोबत अत्यंत कमी संवाद साधला आणि इमिग्रेशनची खोटी कहाणी पुन्हा सांगितली आणि नंतर तु मोबाईलवर फोन करू नकोस आपण अपहरणामध्ये असल्याचे सांगितले. त्यानंतर battery संपल्याने त्याचा फोन पूर्णपणे बंद झाला. बराच वेळ पतीशी संपर्क होत नसल्याने पत्नी घाबरली आणि बुधवारी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पतीच्या अपहरणाची तक्रार दाखल केली.
पोलिसांनी तपासाला सुरुवात केल्यानंतर मात्र बिझनेसमनने रचलेल्या कथानकाचा पडदा उघडला आणि संपूर्ण सत्य समोर आले. आपले अनैतिक संबंध लपवण्यासाठी पतीने स्वतःच्या अपहरणाची ही कहाणी रचल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.


