(चिपळूण /रत्नागिरी प्रतिनिधी)
दुचाकीच्या दोन्ही हँडलला लोंबकळणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या हँडलमध्ये अडकल्याने नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात ६० वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना चिपळूण तालुक्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर घडली. या प्रकरणी सावर्डे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप गणपत पाटील (६०, रा. शंकरवाडी, चिपळूण) हे त्यांच्या ताब्यातील स्प्लेंडर मोटारसायकलवरून सावर्डेहून चिपळूणच्या दिशेने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरून जात होते. त्यांच्या दुचाकीला परवाना आणि विमा नसल्याचे तसेच त्यांनी हेल्मेट परिधान केले नसल्याचे पोलिस नोंदीत नमूद करण्यात आले आहे. पाटील यांनी दुचाकीच्या दोन्ही हँडलला केबल आणि विद्युत साहित्य असलेल्या दोन प्लास्टिकच्या पिशव्या अडकवल्या होत्या. १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास ते कोडमला पाटाजवळील चढावातील वळणावर आले असता हँडलला अडकवलेल्या पिशव्या हँडलमध्ये अडकल्या. त्यामुळे दुचाकीवरील त्यांचा ताबा सुटला आणि तोल जाऊन ते मोटारसायकलसह रस्त्यावर कोसळले.
या अपघातात प्रदीप पाटील यांच्या तोंडाला आणि चेहऱ्याला गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्या. या दुखापतींमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिस नोंदीत नमूद करण्यात आले आहे. त्यांच्या निष्काळजीपणामुळेच हा अपघात होऊन ते स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा पोलिसांचा आरोप आहे. या प्रकरणी सावर्डे पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १२३/२०२६ नोंदवण्यात आला आहे. भारतीय न्यायसंहिता अधिनियमातील कलम १०६(१), १२५(अ), १२५(ब), २८१ तसेच मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची फिर्याद स्वप्निल विजय साळवी (सहाय्यक पोलीस फौजदार/४४५, सावर्डे पोलिस ठाणे) यांनी दिली असून, सावर्डे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


