(गणपतीपुळे / वैभव पवार )
रत्नागिरी तालुका शालेय फ्रीस्टाईल व ग्रीको-रोमन कुस्ती स्पर्धा सोमवार, दि. 18 ऑगस्ट 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, रत्नागिरी येथे मोठ्या उत्साहात पार पडल्या. तब्बल 200 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवित विक्रमी प्रतिसाद दिला. दिवसभर रंगलेल्या सामन्यांमुळे क्रीडांगणावर उत्साह व रोमांचाचे वातावरण अनुभवायला मिळाले.
भव्य उद्घाटन सोहळा
या स्पर्धांचे उद्घाटन रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्री. गजानन (आबा) पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी फणसोप हायस्कूलच्या मुख्याध्यापिका व क्रीडापटू सौ. नेत्रा राजेशिर्के, बसणी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. नाईक, तालुका क्रीडा समन्वयक श्री. विनोद मेयेकर, स्पर्धा प्रमुख श्री. तुफिल पटेल यांच्यासह क्रीडाशिक्षक, मार्गदर्शक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. तुफिल पटेल यांनी केले, तर आभारप्रदर्शन सौ. नेत्रा राजेशिर्के यांनी केले.
स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी क्रीडाशिक्षक व स्वयंसेवकांनी मोलाची भूमिका बजावली. पंच म्हणून उमरे हायस्कूलचे श्री. गलांडे, कुरतडे हायस्कूलचे श्री. कदम सर व पालीचे सुपुत्र श्री. भावेश सावंत यांनी काम पाहिले. सामन्यांचे आयोजन व गुणलेखन प्रसिद्ध कुस्तीपटू स्वप्निल घडशी यांनी केले. वेळाधिकारी म्हणून ऋषिकेश साळुंखे, तर निकालपत्रक तयार करण्याचे काम शिवाजी हायस्कूलचे शिक्षक श्री. सैफुद्दीन पठाण यांनी केले.
उभरत्या खेळाडूंना व्यासपीठ
या स्पर्धांतून अनेक उभरते कुस्तीपटू पुढे येत असून त्यांना जिल्हास्तरीय स्पर्धेत संधी मिळणार आहे. खेळाडूवृत्ती, शिस्तबद्ध आयोजन आणि ग्रामीण शाळांचा मोठा सहभाग हे या स्पर्धांचे वैशिष्ट्य ठरले. विद्यार्थ्यांच्या क्रीडाविकासासाठी तसेच कुस्ती या पारंपरिक खेळाला चालना देण्यासाठी अशा स्पर्धा अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे उपस्थित मान्यवरांनी नमूद केले. पुढील जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत या विजेत्या खेळाडूंना रत्नागिरी तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.

