(संगमेश्वर/ प्रतिनिधी)
बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने महिलेच्या पर्समधील छोट्या पाकिटातून तब्बल २ लाख ६५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना साखरपा बसस्थानकात घडली. याप्रकरणी देवरुख पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विनिता विकास अवसरे (४८) या पतीसह अंत्रवली (ता. संगमेश्वर) येथे जाण्यासाठी साखरपा बसस्थानकात आल्या होत्या. कोल्हापूरहून संगमेश्वरमार्गे चिपळूणकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या खांद्याला लावलेल्या पर्समधील छोट्या पाकिटावर डल्ला मारला. या पाकिटात अंदाजे पाच तोळे वजनाचे २ लाख ५० हजार रुपये किमतीचे जुने वापरातील सोन्याचे मंगळसूत्र आणि अंदाजे साडेतीन ग्रॅम वजनाची १५ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी ठेवण्यात आली होती. बसमध्ये चढल्यानंतर दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले. या घटनेत एकूण २ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. चोरीची घटना घडल्यानंतर विनिता अवसरे यांची प्रकृती बिघडल्याने पोलिसांत तक्रार देण्यास विलंब झाला. त्यांना शुगरचा त्रास असल्याने तब्येत बिघडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर त्यांनी देवरुख पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
ही घटना १६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास साखरपा बसस्थानकात घडली. याप्रकरणी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ३०३(२) अन्वये अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून चोरट्याचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे. गर्दीच्या ठिकाणी प्रवाशांनी मौल्यवान वस्तू आणि दागिने सांभाळून ठेवावेत, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात येत आहे.


