(संगमेश्वर / एजाज पटेल)
खेड तालुक्यातील कुंभवळी येथील वयोवृद्ध महिला रुग्णाला कामथे कुटीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असताना, रुग्णालय प्रशासनाच्या अक्षम्य हलगर्जीपणाचा धक्कादायक अनुभव आला. रुग्णाला चक्क रक्त लागलेली चादर पांघरायला देण्यात आली, यामुळे रुग्ण नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे. या गंभीर प्रकाराची तातडीने चौकशी करण्यात यावी, तसेच दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी स्थानिक आमदार शेखर निकम आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे करण्यात आली आहे.
रक्त लागलेली चादर, कर्मचारी उद्धट आणि रुग्णसेवेची भयावह स्थिती
घटनेची माहिती अशी, शफिया सकवारे या ७० वर्षीय वृद्ध महिलेला मध्यरात्री १.३० वाजता कामथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, बेडवर कोणतीही उशी, चादर किंवा बेडशीट नव्हती. मुलगा यासिन सकवारे यांनी आवश्यक वस्तूंची मागणी केली असता, कर्मचाऱ्यांनी चिडचिड करत त्या देण्यात आल्या. मात्र दिलेली चादर लहान असल्याने थोडी मोठी चादर मागितली असता, एका सफाई कामगाराने ऑपरेशन थिएटरमधून आणलेली रक्त लागलेली चादर दिली. रुग्णाच्या नातेवाईकांनी या प्रकाराची तक्रार तत्काळ ड्युटीवर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे केली. मात्र, संबंधित अधिकाऱ्याने आपल्या कर्मचाऱ्याचे समर्थन करत, “कोणाकडे तक्रार करायची असेल तर करा, आम्हाला काही फरक पडत नाही,” अशी उर्मट आणि उद्धट प्रतिक्रिया दिली.
संपूर्ण रुग्ण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
रक्त लागलेली चादर दुसऱ्या रुग्णाला वापरायला देणे ही गंभीर आरोग्यविषयक चूक असून, संसर्गजन्य आजार पसरण्याचा धोका संभवतो. यामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ होत असल्याची गंभीर भावना रुग्ण कुटुंबीयांनी व्यक्त केली. या घटनेने भयभीत झालेल्या नातेवाईकांनी रुग्णावर उपचार घेण्याऐवजी स्वतःहून दुसऱ्या दिवशी सकाळी डिस्चार्ज घेतला. इतकेच नव्हे, तर उपचारादरम्यान सलाईन काढताना महिला सेविकेने अत्यंत असावधपणे सुई ओढल्याने वृद्ध रुग्णाच्या हातातून अधिक रक्तस्राव झाला, अशी तक्रारही करण्यात आली आहे.
या प्रकरणावर प्रतिक्रिया घेण्यासाठी पत्रकारांनी कामथे कुटीर रुग्णालयाचे वरिष्ठ डॉक्टर असित नरोडे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी संबंधित घटना घडल्याचे मान्य करत, “ती चादर चुकून दिली गेली,” असे स्पष्टीकरण दिले. मात्र, यावर पत्रकारांनी तत्काळ प्रतिप्रश्न करत विचारले की, “चादर चुकून कशी दिली जाऊ शकते? स्वच्छ चादरी ऑपरेशन रूममध्ये ठेवाव्यात की अन्य ठिकाणी, याचे नियोजन नसते का?” तसेच त्यांनी पुढे विचारले की, “ही गंभीर चूक लक्षात आणून दिल्यानंतर देखील ड्युटीवर असलेले डॉक्टर उर्मटपणे का वागले? त्यांनी रुग्णाच्या नातेवाईकांशी उद्धटपणे संवाद का साधला?” मात्र यावर डॉ. नरोडे यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले.
या घटनेवरून कामथे रुग्णालयातील सेवा, स्वच्छता आणि कर्मचारी वर्तन याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. एकीकडे सरकारी पातळीवर आरोग्य सेवा सुधारण्याचे गाजर दाखवले जात असतानाच, अशा घटनांमुळे सरकारी रुग्णालयांविषयी नागरिकांमध्ये अविश्वास वाढत आहे. या प्रकाराची गंभीर चौकशी होऊन संबंधित दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी स्थानिक पातळीवर केली जात आहे.